Ahmednagar Politics : मागील निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांना सर्व सहा विधानसभा मतदारसंघांतून मताधिक्य मिळाले होते. यावेळी मात्र त्यांना तीन विधानसभा मतदारसंघांतच मताधिक्य मिळाले, पण तेही गतवेळपेक्षा घटले, तर तीन मतदारसंघांत नीलेश लंके यांनी आघाडी घेत विखेंवर मात केली.
जर एकंदरीत मताधिक्यांचा आढावा घेतला तर लक्षात येईल की, भाजपच्या मतदारसंघामध्ये नीलेश लंकेंना साथ राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात तुलनेने कमी मते मिळाली. येथे सुजय विखे यांचे प्राबल्य दिसले.
श्रीगोंदे
श्रीगोंदे येथे विखेंच्या प्रचारासाठी भाजप आ. बबनराव पाचपुते व राष्ट्रवादीचे (अजित पवार) राज्य उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे हे एकत्र आले. मात्र, मतदारांनी लंके यांनाच पसंती दिली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे असू शकते. माजी आ. राहुल जगताप यांच्यामुळे लंके यांना निर्णायक लीड मिळाल्याने जगताप हेच दावेदार आहेत.
राहुरी
२०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये २५ हजार मतदार संख्या वाढलेली असतानाही, लंके यांना लीड मिळाले नाही. येथे राष्ट्रवादीचे आ. प्राजक्त तनपुरे हे आमदार आहेत. शहरी भागात विखे व लंके जवळजवळ बरोबरीत राहिले, तर ग्रामीण भागात विखे यांच्यापेक्षा लंके यांचे मताधिक्य वाढलेले दिसले.
जामखेड : भाजप आ. शिंदे यांची जादू नाहीच, आ. पवारांचे नेतृत्व झळाळले
जामखेड कर्जत-जामखेड मतदारसंघात खासदार नीलेश लंके यांना ९ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले असून, भाजप आ. राम शिंदे यांना वरिष्ठांना तोंड द्यावे लागणार आहे. लोकसभेत जरांगे व मुस्लिम फॅक्टर विधानसभेत चालणार आहे.
त्याचा फायदा आ. पवार यांना होणार आहे, तर आ. राम शिंदे यांच्या मागे ओबीसी किती प्रमाणात राहतो, यावरही बरेच काही ठरेल. भाजपचे राम शिंदे या मतदारसंघातील आहेत. तेही विखे यांना तारू शकले नाहीत. गतवेळी विखेंना या मतदारसंघात २४ हजारांचे मताधिक्य होते.
पाथर्डी शेवगाव
गतवेळी शेवगाव-पाथर्डीत विखेंना ५९ हजार मतांचे मताधिक्य होते. यावेळी तेथे सात हजारांचेच मताधिक्य मिळाले. ५१ हजार मतांनी तेथे मताधिक्य घटले. शेवगाव-पाथर्डीत मोनिका राजळे, घुले बंधू त्यांच्यासोबत होते. मात्र, तरीही विखे यांचे मताधिक्य घटले. शेवगाव- पाथर्डीत प्रताप ढाकणे हे लंकेंसोबत होते.