Ahilyanagar News : नगर-श्रीगोंदे-कर्जत परिसरात मल्टीमोडल लॉजिस्टक हब स्थापन करून पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ देण्याची आग्रही मागणी खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी केंद्रीय नौवहन, बंदर व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे केली.
खा. लंके यांनी मंत्री सोनोवाल यांना या मागणीचे निवेदनही सादर केले. खा. लंके यांनी यासंदर्भात मंत्री सोनोवाल यांची भेट घेत शेती, उद्योग आणि रोजगाराला गती मिळेल याकडे लक्ष वेधत लॉजिस्टिक हबमुळे स्थानिक शेतकऱ्यांना थेट बंदर संपर्क, प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोअरेज, लघुउद्योगांना चालना मिळून रोजगार निर्मितीस मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. स्थानिक बाजारपेठेला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होणार असून युवकांसाठीही रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होतील असा विश्वास खा. लंके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

शेतकऱ्यांना फायदा, रोजगार निर्मिती
खासदार नीलेश लंके यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार लॉजिस्टिक हबमुळे स्थानिक शेतकऱ्यांना थेट बंदर संपर्क, प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोअरेज, लघुउद्योग यांना चालना मिळून रोजगार निर्मितीस मोठा फायदा होणार आहे. स्थानिक बाजारपेठेला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होणार असून युवकांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होतील.
आवष्यक जमीन व स्थानिकांचा पाठींबा
या हबसाठी या परिसरात आवष्यक जमीन उपलब्ध असून स्थानिकांचा सक्रीय पाठींबा या प्रस्तावास लाभला असल्याचे खा. लंके यांनी मंत्री सोनोवाल यांच्या निदर्शनास आणून दिले. सागरमाला योजनेचा उद्देश म्हणजे बंदरांना राज्याच्या आतील भागांशी जोडणे हा आहे त्यामुळे हे क्षेत्र त्यासाठी अत्यंत योग्य असल्याचा दावा त्यांनी केला. केंद्र सरकारने या मागणीची दखल घेऊन नगर-श्रीगोंदे-कर्जत हबला सागरमाला प्रकल्पात समाविष्ट करावे अशी मागणी करतानाच हा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रगतीची नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास खा. लंके यांनी व्यक्त केला.
निर्यातक्षम शेतीचे उत्तम केंद्र
नगर, श्रीगोंदे व कर्जत तालुके हे जेएनपीटी बंदरांशी रेल्वेने थेट जोडलेले असून एम.एच.१६० महामार्ग शिर्डी, पुणे विमानतळ आदी दळणवळणाच्या उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. या भागात द्राक्षे, डाळिंब, कांदा, उस, गहू, जैविक उत्पादने मोठया प्रमाणात उत्पादीत होत असून निर्यातक्षम शेतीचे उत्तम केंद्र म्हणून या भागाकडे पाहिले जात असल्याचे खा. लंके यांनी यावेळी मंत्री सोनोवाल यांच्या निदर्शनास आणून दिले.