Nashik : काल राज्यात विधानसभेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये महाविकास आघाडीला तीन जागा मिळवत चांगले यश मिळाले असून भाजपला एक तर अपक्षाला एक जागा मिळाली. या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते.
असे असताना निकालानंतर बाद मतांची जास्त चर्चा सुरू होती. अनेक ठिकाणी बाद मतांमुळे निकालाचे गणित बदलले. याचा फटका अनेक उमेदवारांना बसला. विशेष म्हणजे ही निवडणूक शिक्षक आणि पदवीधर यांच्यासाठी होती मात्र त्यांनीच असे केले तर सर्वसामान्य लोकांचे काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
हा आकडा थोडा नसून सुशिक्षितांची निवडणूक म्हणून ओळख असलेल्या निवडणुकीत तब्बल १२ हजार ९९७ मते बाद झाली आहेत. यामुळे आता नेटकरी देखील अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. पदवीधर असलेल्या मतदारांचे मत बाद कसे होते, अशी विचारणा सध्या होत आहे.
मतदान करताना याबाबत आधीच सूचना देण्यात आल्या होत्या. नाशिकमध्ये १३ हजार मते बाद झाली. मतदानाच्या सुमारे वीस टक्के मते बाद ठरल्याने यातून पदवीधरांचे अज्ञान दिसून येते. यामुळे नेटकऱ्यांनी पदवीधर मतदारांना सुनावले आहे.
काही पदवीधर तर फक्त टाइमपास करण्यासाठी आले असल्याचे दिसून आले. त्यांच्या मतपत्रिकेवर तर कविता लिहिलेल्या आढळून आल्या आहेत. तर काहींच्या मतपत्रिकेवर वेगवेगळ्या चिन्हाचा वापर केल्याचे दिसून आले.