पानिपतकार विश्वास पाटील लिखित अण्णा भाऊ साठे यांच्या चरित्रग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशनाला शरद पवार, रावसाहेब कसबे येणार हे समजले. कसबे विशेष ‘झोत’ टाकणारच; पण पवारसाहेब झोत टाकणार, त्याचा परिणाम कुठे, हे शोधण्यातच सगळ्यांचा वेळ जातो.
सध्या निवडणुकांचे दिवस आहेत, अशी राजकीय कोटी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी करताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. खुद्द शरद पवार यांनीही मिश्कील हसून तावडे यांना दाद दिली.
सोमवारी सकाळी बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवार यांच्या हस्ते ‘अण्णा भाऊ दि अपहोल्डर दलित अॅण्ड विमेन लिटरेचर’ या इंग्रजी व हिंदी ग्रंथाचे प्रकाशन पार पडले. यावेळी व्यासपीठावर विनोद तावडे हे देखील उपस्थित होते.
एकाच व्यासपीठावर असूनही दोघांमध्ये काही बोलणे झाले नाही. परंतु जेव्हा तावडे भाषण करायला उभे राहिले तेव्हा त्यांनी ही कसर भरून काढली.
रावसाहेब कसबे यांच्या ‘झोत’ या पुस्तकाचा संदर्भ घेऊन त्यांनी पवारांचा ‘झोत’वर प्रकाश टाकलाच, त्याशिवाय पंतप्रधान मोदी यांच्याकडे शरद पवार यांचे खूपच चालते, म्हणत त्यांनी पवार- मोदी संबंधही सूचित केले.
तावडे म्हणाले, ‘मला आठवतं, की मनोहर जोशींच्या पुस्तक प्रकाशनाला संसदेच्या हॉलमध्ये एकदा शरद पवार आले होते. यूपीच्या खासदारांनी त्यांना विचारले, तुम्ही शिवसेनेच्या खासदारांच्या पुस्तक प्रकाशनाला कसे आले?
आमच्याकडे असे केले तर पक्षातूनच काढून टाकतील. महाराष्ट्रातील राजकारण हे असेच प्रगल्भ होते. ‘होते’ असं मी जाणीवपूर्वक म्हणेन, असा उल्लेख करत तावडे यांनी राज्यातील हल्लीच्या राजकारणातील तणावाकडेही लक्ष वेधले.