Pune : राज्यात सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची चर्चा सुरू आहे. सर्व पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. उमेदवार जवळपास निश्चित झाले असून आता वंचीत आघाडी देखील उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
याबाबत आज दुपारी वंचितच्या राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कसब्याच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

याबाबत काल रात्री चाचपणी झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाव्य उमेदवाराला रात्रीतून फोन गेल्याचीही माहिती हाती आली आहे. यामुळे आता अजून एक उमेदवार या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. भाजपने याठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काहीजण इच्छुक आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे.
असे असले तरी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं असलं तरी देखील कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक होणार आहे. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना अजूनही इच्छूक असून आम्ही मविआ म्हणून ही निवडणूक लढवणार आहोत.
यामुळे येणाऱ्या काळात या निवडणुकीबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सर्व पक्षांनी आपले उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत. आता वंचीतने देखील उमेदवार दिला तर महाविकास आघाडीला अडचण ठरू शकते. वंचीतने ठाकरे गटाशी युती केल्याची घोषणा देखील काही दिवसांपूर्वी केली होती.