Shankarrao Gadakh News : अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. या जिल्ह्याला सहकाराची पंढरी म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या सुद्धा खूपच अधिक आहे. याच कारखान्याच्या जिल्ह्यामधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखानदारांसाठी मोठी मागणी उपस्थित करण्यात आली आहे. खरे तर ऊस हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे बागायती पीक आहे.
या पिकाची राज्यातील अनेक भागांमध्ये लागवड केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार अडचणीत आले आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे साखर कारखानदारांना शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात सुद्धा अडचणी येत आहेत.
गेल्या पाच सहा वर्षांपासून अशीच परिस्थिती असून याचं परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन माजी मंत्री आणि आमदार शंकरराव गडाख यांनी साखरेच्या किमान विक्री दरात प्रतिक्विंटल 4200 रुपयांपर्यंतची वाढ करण्याची मोठी मागणी यावेळी केली आहे.
मुळा कारखान्यावर झालेल्या वार्षिक सभेत शंकरराव गडाख यांनी ही मागणी उपस्थित केली आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना माजी मंत्री आणि आमदार शंकरराव गडाख यांनी असे म्हटले की, ‘गेल्या चार ते पाच वर्षांच्या काळात केंद्रातील सरकारने उसाच्या एफआरपीत चार वेळा वाढ केली आहे.
यासोबतच इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. इंधनाच्या किमती वाढल्या असल्याने ऊसतोड मजुरी आणि वाहतुकीचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वधारला आहे. उसापासून साखर तयार करण्याच्या प्रक्रियेत देखील आता मोठा खर्च होऊ लागला आहे. सर्वच ओव्हरहेड खर्चात वाढ झाली आहे.
एवढेच नाही तर साखर तयार झाल्यानंतर ती साखर गोडाऊन मध्ये साठवण्यासाठी, हाताळणी व विमा खर्चातही वाढ झाली आहे. गडाख यांनी सांगितल्याप्रमाणे सध्या साखर निर्मितीला येणारा उत्पादन खर्च, उसाची किंमत आणि साखर विक्रीतून कारखानदारांना मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.
त्यामुळे राज्यातील अनेक साखर कारखानदारांना शेतकऱ्यांची एफआरपी देखील देता येत नाहीये. परिणामी राज्यातील काही कारखानांवर जप्तीची कारवाई झाली आहे. ही सर्व परिस्थिती विचारात घेऊन आता साखरेची किमान विक्री किंमत ही 4200 रुपये प्रति क्विंटल एवढी वाढवली गेली पाहिजे.’
यासोबतच त्यांनी साखर निर्यात पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. साखरेवरील निर्यात बंदी उठवत केंद्रातील सरकारने किमान 25 लाख टन साखर निर्यातीला ताबडतोब मंजुरी दिली पाहिजे अशी मागणी यावेळी गडाख यांनी केली आहे.