Shrigonda Politics : येत्या काही तासांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता थांबणार आहे. उद्या अर्थातच 18 नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता प्रचाराची ही रणधुमाळी थांबेल आणि येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असणाऱ्या प्रचार सभांचा झंझावात आता अंतिम टप्प्यात आला आहे.
यामुळे महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून आता जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांकडून जोरदार कसरत केली जात आहे. महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र विक्रम दादा पाचपुते यांनी देखील जोरदार शक्ती प्रदर्शन करत पाचपुते यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी कंबर कसली आहे.
खरंतर श्रीगोंदा म्हटलं की बबनराव पाचपुते आणि बबनराव पाचपुते म्हटलं की श्रीगोंदा असे या मतदारसंघाचे समीकरण आहे. हा मतदारसंघ विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. बबनदादांनी आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात विविध पक्षांच्या चिन्हावर येथून निवडणूक लढवली आहे आणि जिंकली सुद्धा आहे.
अर्थातच या मतदारसंघात पक्षापेक्षा नेता महत्त्वाचा आणि नेता कोण तर ते बबनराव पाचपुते हेच गणित चालते. यावेळी मात्र आजारपणामुळे बबनराव पाचपुते यांच्या ऐवजी त्यांचे सुपुत्र विकीदादा पाचपुते हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खरे तर विकीदादा यांच्या मातोश्री यांना आधी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली होती.
मात्र पाचपुते दांपत्यांकडून आपल्या लेकाला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही मागणी केली जात होती आणि याच अनुषंगाने अगदीच शेवटच्या टप्प्यात विकीदादांना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. म्हणून श्रीगोंद्यात ऐनवेळी उमेदवारी बदलली असल्याने याचा फटका भाजपाला बसू शकतो का? अशा काही चर्चा मध्यंतरी सुरू झाल्या होत्या.
पण, उमेदवारी बदलाचा कोणताच फटका पक्षाला बसणार नाही, बबनराव पाचपुते जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला आम्ही निवडून आणू, असा निर्धार व्यक्त करत कार्यकर्त्यांनी काम केले आहे. दरम्यान निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच विक्रम पाचपुते यांची ताकद वाढली आहे. कारण की जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बबनराव मदने यांनी विक्रम पाचपुते यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय.
आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबाकडून सर्व सामान्य कार्यकर्त्यांना नेहमीच सन्मानाची वागणूक मिळते पण नागवडे कुटुंबाकडून गोरगरीब जनतेला दांडक्याचा मार खावा लागत आहे त्यामुळे धनगर समाज हा आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीर उभा राहणार असे विधान बबनराव मदने यांनी केले. माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव मदने हे धनगर समाजाच्या बैठकीत बोलत होते.
तसेच त्यांनी आपण या निवडणुकीत विक्रम पाचपुते यांना पाठींबा दिला असल्याचे जाहीर केले आहे. धनगर समाजाचा आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव मदने यांचा आता विकीदादांना पाठिंबा राहणार असल्याने याचा त्यांना निवडणुकीत फायदा होईल असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होऊ लागले आहे.