……तेव्हा माझा स्टेपनी टायर सारखा वापर होतो, सुजय विखे पाटील यांचे मिश्किल वक्तव्य

Tejas B Shelar
Updated:
Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. महायुतीने लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभव स्वीकारत आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली आहे.

महायुतीचे महिला मतदारांकडे विशेष लक्ष असल्याचे दिसते. यासाठी महायुती सरकारने राज्यातील महिलांना केंद्रस्थानी ठेवून लाडकी बहीण, अन्नपूर्णा अशा योजना सुरू केल्या आहेत. दुसरीकडे राजकीय नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मैदानावर उतरत प्रचाराआधीच मतदारांना आपल्याकडे वळवण्यास सुरुवात केली आहे.

नगरमध्येही असेच वातावरण आहे. काल श्रीरामपूर येथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. खरंतर या प्रमाणपत्रांचे वाटप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार होते.

मात्र मुंबईहून श्रीरामपूरच्या दिशेने येत असतांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे त्यांना वेळेत कार्यक्रमासाठी पोहोचता येणार नव्हते. मग काय त्यांनी माजी खासदार अन विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक सुजय विखे पाटील यांना कालच्या या कार्यक्रमासाठी पाठवले.

सुजय विखे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार सुद्धा पडला. मात्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमाला येऊ न शकल्याने सुजय विखे यांनी एक मोठं मिश्किल वक्तव्य केलं. यामुळे कार्यक्रमास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये अन कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.

काय म्हणालेत सुजय विखे पाटील?

माजी खासदारांनी, ‘या अशा कार्यक्रमात येण्याचा माझा फार संबंध येत नाही, आमच्या घरात माझी भूमिका फक्त स्टेपनीची आहे. म्हणून गाडीचे मुख्य टायर जेव्हा पंक्चर होते, तेव्हा माझा स्टेपनी सारखा वापर करून मला पळवलं जातं. साहेब ( मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ) याठिकाणी येऊ शकले नाहीत म्हणजे परिवाराचा मुख्य टायर काही कारणास्तव पळू शकलं नाही. त्यामुळे स्टेपनी म्हणून मी कार्यक्रमाला आलो,’ असं मिश्किल वक्तव्य करून साऱ्या उपस्थितांना हसायला भाग पाडलं.

…. तर त्याच्यावर कारवाई करू

साधारणता एका महिन्याभरापूर्वी हत्या, गोळीबार, आणि लुटमारीचे विविध गुन्हे दाखल असणारा मोक्क्यातील आरोपी दीपक पोकळे आणि त्याच्या एका मित्राने सुजय पर्व नावाने संपर्क कार्यालय सुरू केलं. खरे तर पोकळे जेलमध्ये बंद होता मात्र जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी आपल्या मित्राच्या साह्याने हे संपर्क कार्यालय सुरू केलं. या कार्यालयाचे उद्घाटन स्वतः सुजय विखे पाटील यांनी केले.

त्यावेळी अनेक मोठमोठे फ्लेक्स लावले गेले होते ज्यामध्ये दीपक पोकळे याचा फोटो होता. पण प्रत्यक्षात तो कार्यक्रमाला हजर नव्हता. यामुळे याबाबत सुजय विखे पाटील यांना प्रश्न विचारले गेलेत. यावेळी सुजय विखे पाटील यांनी जर माझ्या नावाचा कुणी गैरवापर करत असेल तर त्याच्यावर कारवाई करू असा इशारा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe