Vidhansabha Nivdnuk 2024 : सध्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू आहेत. निवडणूक आयोग लवकरच विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार असल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे. येत्या दोन-तीन दिवसात निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही गटांमध्ये म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुतीत सध्या जागा वाटपावर आणि मुख्यमंत्री पदाबाबत बंद दाराआड सखोल चर्चा केली जात आहे.
महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल या संदर्भात आघाडीतील पक्षांनी कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र नुकत्याच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जर हायकमांडने आदेश दिला तर मुख्यमंत्री होणारच असे विधान केले आहे.
त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या टीकेला उत्तर देताना असे विधान केले होते. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे सीएम पदाचे योग्य उमेदवार असल्याचे वारंवार म्हटले आहे.
ठाकरे गट महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा सार्वजनिक केला पाहिजे आम्ही त्याला पाठिंबा देऊ अशी भूमिका घेऊन उभे आहेत. एकंदरीत, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून जागावाटपापेक्षाही अधिकचा गदारोळ दिसतो.
अशातच, आता महायुतीकडूनही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात मोठे विधान समोर आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नेमका कोण असेल या संदर्भात विधान केले आहे.
महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत, ‘विधानसभा निवडणुकीची तयारीजोरात सुरू झाली आहे. पण, निवडणुका पाहून आम्ही काम करत नाही, निवडणुका असोत किंवा नसोत आमचे काम सुरूच असते.
गेल्या दोन वर्षांत जे पायाभूत प्रकल्प झाले आहेत, जे उद्योग आले आहेत, ज्या कल्याणकारी योजना सुरू झाल्या आहेत, त्याचा हिशेब आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, महाविकास आघाडीचे सरकारचे अडीच वर्ष आणि आमचे दोन वर्षांचे काम यांची तुलना केल्यास मला विश्वास आहे की जनता आमच्या पाठीशी उभी राहील. यावेळी आम्ही प्रचंड मतांनी विजयी होऊ.
दरम्यान महायुतीचा सीएम कोण? यावर बोलताना शिंदे यांनी आमची टीम एकत्र निवडणूक लढवणार, आधी निवडणूक जिंकण्यासाठी टीम म्हणून काम करू आणि मग बघू कोण सीएम होणार ? असे विधान केले आहे. एकंदरीत महायुतीने निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण राहणार हे जाहीर करण्याची भूमिका ठेवली आहे.