नंदुरबारच्या तरुणाची यशोगाथा ! छोट्या खोलीत केशर उत्पादन घेत लाखोंची कमाई

शेतीसंबंधी काही पद्धती व तंत्र शिकत असताना त्याला केशर या नवीन पिकाची माहिती मिळाली. या माहितीमध्ये त्याला कळले की केशराची लागवड काश्मीरमध्ये केली जाते व त्या ठिकाणचे हवामान केशर पिकासाठी अनुकूल आहे. महाराष्ट्र मध्ये असलेल्या उष्ण वातावरणात केशर पिकवणे हे एक आव्हान आहे.

Ajay Patil
Updated:

आजकाल अनेक तरुण आपण बघतो की, ते अनेक प्रकारचे छोटे-मोठे प्रयोग करत असतात व असे प्रयोग करत असताना त्यांना एखादा व्यवसायाचा मार्ग सापडतो व त्यातून अगदी कमी वयामध्ये ते लाखो रुपयात खेळायला लागतात. या सगळ्या प्रयोगांमध्ये त्यांची जिद्द तर असतेच.

परंतु काहीतरी वेगळे करावे व यामध्ये कौशल्य प्राप्त करून चांगला पैसा मिळवावा हे प्रमुख उद्दिष्ट अशा तरुणांचे असते.याच प्रमाणे आपण जर नंदुरबारच्या हर्ष पाटील याची यशोगाथा बघितली तर ती इतर तरुणांना प्रेरणा देणारी आहे.

नैसर्गिक परिस्थिती आणि हवामान बदलामुळे घरच्या शेतीचे खूप मोठे नुकसान होत होते व हर्ष हे  जवळून पाहत होता. त्यामुळे आपण काहीतरी केले पाहिजे हे त्याच्या मनात आले व या दृष्टिकोनातून त्यांनी पावले उचलायला सुरुवात केली.

 कसा सुचला केसर लागवडीचा पर्याय?

हर्ष पाटील यांची तब्बल 120 एकर शेती असून यामध्ये त्यांचे कुटुंब टरबूज तसेच कापूस व केळी या पिकांचे उत्पादन घेतात. परंतु गेल्या काही वर्षापासून वातावरणातील बदल आणि सततचा अवकाळी पाऊस यामुळे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे हर्षने पाहिले.

विशेष म्हणजे 2022 या वर्षाच्या डिसेंबरमध्ये कापूस पीक काढणीसाठी आलेले असताना अचानक पावसाने खूप मोठे नुकसान केले. यामुळे वडिलांना झालेला त्रास पाहून हर्षच्या मनात आले की शेतीच्या काहीतरी नवीन पद्धती आणि तंत्र अमलात आणायचे. तेव्हा हर्ष कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता.

वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या संधी

या कालावधीमध्ये हर्ष वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या संधी शोधत होता. परंतु त्याच्या पालकांचा मात्र याला विरोध होता व हर्षने अभ्यासात लक्ष घालावे अशी त्यांची इच्छा होती. त्यानंतर तो मुंबईत कॉम्प्युटर सायन्सच्या शिक्षणासाठी गेला व त्या ठिकाणी शेतीचे नवीन तंत्र आणि पद्धती शिकायला सुरुवात केली.

उष्ण वातावरणात केशर पिकवणे आव्हान

शेतीसंबंधी काही पद्धती व तंत्र शिकत असताना त्याला केशर या नवीन पिकाची माहिती मिळाली. या माहितीमध्ये त्याला कळले की केशराची लागवड काश्मीरमध्ये केली जाते व त्या ठिकाणचे हवामान केशर पिकासाठी अनुकूल आहे. महाराष्ट्र मध्ये असलेल्या उष्ण वातावरणात केशर पिकवणे हे एक आव्हान आहे.

एरोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर

परंतु हर्षने नियंत्रित वातावरणात एरोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करायचे ठरवले व पंधरा बाय पंधराच्या खोलीत केशरची लागवड करण्याचा निश्चय केला व केशर लागवड केली. एरोपोनिक्स तंत्रामध्ये झाडांची वाढ मातीशिवाय केली जाते व हवेतूनच झाडांना आवश्यक पोषक तत्त्वांचा पुरवठा होत असतो.

याकरिता हर्ष याने केशर साठी योग्य हवामान उपलब्ध व्हावे याकरिता संपूर्ण खोलीच्या सेटअपमध्ये ह्युमिडीफायर आणि एअर कंडिशनर इन्स्टॉल केले व अशा पद्धतीने केशर लागवडीची सुरुवात केली.

 आज करतो लाखोंची कमाई

केशर लागवडीच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये एका छोट्या खोलीत 350 ग्रॅम मोगरा जातीच्या केसरचे उत्पादन मिळवण्यात हर्ष यशस्वी झाला व त्याला एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

आता तो या केशर लागवडीमध्ये एक्सपर्ट झाला असून इतर शेतकरी देखील त्याच्याशी केशर लागवड संदर्भात माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधतात. इतकेच नाहीतर आतापर्यंत हर्षाने 50 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना ऑनलाइन कार्यशाळेच्या माध्यमातून यासंबंधी प्रशिक्षण देखील दिले आहे व आज तो केशर लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe