शेळीपालन व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा व्यवसाय असून कमी खर्चात जास्त उत्पादन देण्याची क्षमता या व्यवसायात असल्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण आता शेळीपालन व्यवसायाकडे वळत आहेत. शेतकऱ्यांना लखपती ते करोडपती बनवण्याची क्षमता या व्यवसायात आहे व यामध्ये आता अनेक शास्त्रीय पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर आल्यामुळे शेळीपालन व्यवसाय खूप महत्त्वाचा व नफा देणारा ठरत आहे.
त्यामुळे अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करणारे सुशिक्षित तरुण देखील आता शेळी पालन व्यवसायामध्ये गुंतवणूक करायला पुढे मागे पाहत नसून त्या माध्यमातून चांगला पैसा देखील मिळवत आहेत.

याच पद्धतीने जर आपण लक्ष्मण टकले या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा दृष्टिकोनातून बघितले तर यांनी देखील इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले व 2013 मध्ये देशी व स्थानिक जातींच्या शेळीपालनाला सुरुवात करून आज त्या माध्यमातून वर्षाला कोटी रूपयांची उलाढाल करत आहेत.
लक्ष्मण टकले शेळीपालन व्यवसायातून कमावतात कोटी रुपये
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात असलेल्या एजवाडी या गावचे लक्ष्मण टकले यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले व त्यानंतर अनेक व्यवसायांमध्ये नशीब आजमावले. त्यानंतर 2013 मध्ये देशी व स्थानिक जातींचे शेळीपालनाला सुरुवात केली.
सुरुवातीला त्यांनी उस्मानाबादी तसेच जमुनापारी, सोजत आणि सिरोही सारख्या क्रॉस ब्रीडिंग जातींची शेळीपालनासाठी निवड केली. सुरुवातीला या माध्यमातून चांगला फायदा त्यांना झाला नाही. त्यानंतर त्यांनी देश विदेशामध्ये जाऊन शेळीपालनाविषयीचे योग्य तंत्रज्ञान मिळवले व 2017 मध्ये 100% आफ्रिकन बोअर जातीच्या 25 शेळ्या घेऊन शेळीपालनाला सुरुवात केली.
याबद्दल ते माहिती देताना म्हणतात की, 100% आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्या वेगाने वाढतात आणि वजनाने देखील जास्त असतात. आफ्रिकन बोर जातीच्या शेळीचे एका महिन्यात आठ ते दहा किलोंनी वजन वाढते. तसेच बंदिस्त शेळीपालनासाठी या शेळ्या खूप फायद्याच्या आहेत.
आज त्यांच्या शेतामध्ये 125 शेळ्यांचा गोट फार्म असून त्या फार्म मधील यांचे वजन सरासरी 40 ते 50 किलोग्रॅम पर्यंत आहे व काही शेळ्या 80 किलोच्या झाले आहेत. प्रत्येक वर्षाला 100 ते 125 शेळ्या विक्रीसाठी तयार होतात. आफ्रिकन बोअर ही शंभर टक्के शुद्ध जात असल्यामुळे त्या शेळ्यांना लाखोची किंमत मिळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
वार्षिक दीड कोटी रुपये पर्यंत शेळ्यांची विक्री ते करतात. यामध्ये शेळीच्या संगोपनासाठी 25 ते 30 लाख रुपयांचा खर्च त्यांना येतो व जवळपास सव्वा कोटी रुपयांची बचत होते. यामध्ये ते योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून एका वर्षामध्ये जवळपास 100 ते 125 आफ्रिकन बोर शेळ्यांचे उत्पादन घेतात.
लक्ष्मण टकले यांच्या शेळीपालनाचा मंत्र
शेळीपालनात यशस्वी होण्यासाठी काय करावे लागते याबद्दल माहिती देताना ते म्हणतात की शेळीपालनात जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच लहान शेळ्यांसाठी सरासरी पाच चौरस फूट तर मोठ्या शेळ्यांसाठी दहा चौरस फूट जागेची उपलब्धता असावी.
शेळीपालन व्यवसायाच्या सुरुवातीला शेळ्यांची जात निवडताना ती दर्जेदार व जातिवंत निवडावी. व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने आरोग्य व आहार व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे असे देखील त्यांनी म्हटले. तसेच अकाली मृत्यू येऊ नये याकरिता शेळ्यांना महत्वाचे वेळेवर उपचार व लसीकरण करावे.