विधानसभेत अहिल्यानगर जिल्ह्यातील सासरा अन जावयाची जोडी ! मंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार? जगताप अन कर्डीले म्हणतात…

आमदार संग्राम भैया जगताप हे तिसऱ्यांदा नगर शहर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेत, त्यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. दुसरीकडे शिवाजीराव कर्डिले हे सातव्यांदा विधानसभेत गेले आहेत. कर्डिले हे माजी मंत्री असून, एक मुरब्बी अन अनुभवी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. विशेष बाब अशी की, शिवाजीराव कर्डिले हे नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे सासरे आहेत.

Tejas B Shelar
Published:
Ahilyanagar News

Ahilyanagar News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. जिल्ह्यातील बारा पैकी दहा जागा महायुतीने काबीज केल्यात. यात नगर शहर विधानसभा मतदारसंघाची आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा देखील महायुतीच्या पारड्यात आली.

नगर शहर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे संग्राम भैय्या जगताप हे विजयी झालेत आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे शिवाजीराव कर्डिले यांनी विजयश्री खेचून आणला.

आमदार संग्राम भैया जगताप हे तिसऱ्यांदा नगर शहर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेत, त्यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. दुसरीकडे शिवाजीराव कर्डिले हे सातव्यांदा विधानसभेत गेले आहेत. कर्डिले हे माजी मंत्री असून, एक मुरब्बी अन अनुभवी नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

विशेष बाब अशी की, शिवाजीराव कर्डिले हे नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे सासरे आहेत. अर्थातच यावेळी विधानसभेत सासरा आणि जावयाची जोडी पाहायला मिळणार आहे. दरम्यान हे दोन्हीजण महायुतीचा भाग असून हे दोघेही मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.

यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सासरा अन जावयाच्या जोडीपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, की दोघांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अशातच आता माजी मंत्री आ. शिवाजीराव कर्डिले आणि आमदार संग्राम भैया जगताप यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठे विधान केले आहे.

काय म्हणालेत जगताप अन कर्डीले ?

आमदार जगताप यांनी आता शेवटी पक्ष दोघांचे वेगळे आहेत. राजकारणामध्ये या चर्चा सातत्याने सुरू असतात. मात्र मंत्रिमंडळा संदर्भात अजून महायुतीमध्ये कोणताच निर्णय झालेला नाही. प्रत्येक पक्षात मात्र इच्छुकांची संख्या वाढलेली आहे.

यामुळे आता काय होईल ते पाहुयात. जेव्हा आपण निवडून येतो तेव्हा, मागणी ही लोकशाहीमार्गाने केली जात असते. अपेक्षा असणं काही गैर नाही. तेव्हा होईल काय ते पाहू, असे म्हणत मंत्रीपदाचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्ट मध्ये ढकलला आहे.

दुसरीकडे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांच्या (आ. संग्राम भैया जगताप) पक्षाचे नेते वेगळे आहेत आणि माझ्या पक्षाचे नेते वेगळे आहेत. यामुळे माझ्या पक्षाचे नेते काय निर्णय घेतील तो मला मान्य करावा लागणार आहे आणि त्यांच्या पक्षाचे नेते काय निर्णय घेतील तो त्यांना मान्य करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe