Ahilyanagar Politics : शिरूर-पुणे रस्त्याच्या कामावरून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. खा.निलेश लंके यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याने भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकल्प नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झाल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.
शिरूर-पुणे रस्त्याच्या कामाचे श्रेय घेणाऱ्यांना भाजपच्या नेत्यांनी फटकारले असून, या प्रकल्पाशी त्यांचा काहीही संबंध नाही, असा आरोप करण्यात आला आहे. पारनेर भाजप अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनी या मुद्द्यावरून खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिरूर-पुणे रस्त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न
शिरूर ते पुणे रस्ता आणि उड्डाणपूल हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पाची घोषणा दोन वर्षांपूर्वीच गडकरींनी केली होती, असा दावा भाजप नेते करत आहेत.हे काम मंजूर करण्यासाठी नगरचे तत्कालीन खासदार सुजय विखे पाटील होते. मात्र, अलीकडेच खासदार निलेश लंके यांनी माध्यमांमध्ये हे काम आपण मंजूर केल्याचा दावा केला, यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे.
खासदारांचा काहीही संबंध नाही
“तुमचा या कामाशी संबंध काय?” असा थेट सवाल पारनेर भाजपाचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनी केला आहे. त्यांनी हेही सांगितले की शिरूर ते पुणे रस्त्याच्या कामाशी नगरच्या खासदारांचा काहीही संबंध नाही, तरीही श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तुम्ही खासदार कोणत्या जिल्ह्याचे ?
देवीभोयरे गावातील ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात भाजप नेते राहुल पाटील शिंदे बोलत होते. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ज्याच्यावर अन्याय होतो त्याला आम्ही न्याय देऊ शकतो”, त्यामुळे पोलिस व तहसील प्रशासनही शांततेत काम करत आहेत.
यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत “शिरूर-पुणे रस्त्याच्या कामाच्या बातम्या देणाऱ्यांचा या प्रकल्पाशी संबंधच काय?” असा प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर “तुम्ही खासदार कोणत्या जिल्ह्याचे? तुम्ही बातमीतून श्रेय कोणत्या जिल्ह्याचे आणि कामाचे घेता?” असा टोला त्यांनी लगावला.
अतिक्रमण हटवा आणि मग श्रेय घ्या!
विशेष म्हणजे “तुमच्या गावातील अतिक्रमण आधी हटवून दाखवा” असे जाहीर आव्हानही राहुल पाटील शिंदे यांनी दिले आहे. लंके यांचा थेट नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली आणि “तुमच्या खाली खूप अंधार पडलेला आहे, तो तुम्हाला दिसत नाही!” आणि “तुमच्या डोक्यावरचे भूत जनता विधानसभेला उतरवले आहेच, पुढच्या पाच वर्षांतही हीच पुनरावृत्ती होणार!” असा इशाराही त्यांनी दिला.
तर मोठी किंमत मोजावी लागेल
कार्यक्रमादरम्यान आमदार काशिनाथ दाते यांनीही विरोधकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सुसंस्कृत राजकारण आणि समाजकारण केल्यामुळेच जनता माझ्यावर विश्वास ठेवून मला आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली आहे.”
मात्र, काही विरोधक अजूनही “डोक्यात खटका ठेवून फिरत आहेत”, असे ते म्हणाले. त्यांनी शांततेचा सल्ला दिला असला तरी, “माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला किंवा डिवचण्याचा प्रयत्न केलात, तर मला जशास तसे उत्तर द्यावे लागेल, आणि त्याची मोठी किंमत मोजावी लागेल!” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.