Ahmednagar Farmer Success Story : अलीकडे शेतीमध्ये नाविन्यपूर्ण असे बदल पाहायला मिळत आहेत. शेतकरी बांधव आता फळबाग पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. फळबाग पिकांमध्ये डाळिंब द्राक्ष केळी यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
मात्र जांभूळ सारख्या पारंपारिक फळ पिकांच्या शेतीकडे शेतकरी फारसे धजावत नाहीत. जांभूळ फळ पिकातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा याकडे कल नाहीये. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या एक एकर शेतजमीनीत 300 जांभुळाचीं झाडाची लागवड केली आहे.

एका एकरात जांभुळाची बाग फुलून या प्रयोगशील शेतकऱ्याने आंतर पिकाच्या माध्यमातून लाखोंची कमाई देखील केली आहे. यामुळे हा पारंपारिक प्रयोग सध्या शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान आज आपण या प्रयोगशील शेतकऱ्याचा हा प्रयोग जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.
राहुरी तालुक्यातील मौजे वळण येथील गणेश अशोक राजदेव प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या एक एकर शेत जमिनीत जांभूळ फ़ळबाग लागवडीचा प्रयोग केला आहे. त्यांनी आपल्या शेतजमिनीत बारडोली जातीच्या जांभळाची लागवड केली आहे. गणेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभळाचे पीक हे पारंपारिक असले तरीदेखील याचे औषधी गुणधर्म पाहता बाजारात याला चांगली मागणी आणि भाव मिळतो.
यापासून वर्षातून एक ते दोनच महिने उत्पादन मिळते यामुळे जांभळाची बाग कोणी लावत नाही. मात्र, पारंपारिक शेतीमध्येच काहीतरी नवीन आणि वेगळं पण सिद्ध करायचं म्हणून गणेश यांनी जांभळाची लागवड केली. गणेश यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या एक एकरात तीनशे जांभळाच्या रोपांची लागवड केली. जांभूळ लागवड केल्यानंतर त्यामध्ये त्यांनी इतर पारंपारिक पिकांची आंतर पिक म्हणून लागवड केली. पहिल्या वर्षी कांदा या नगदी पिकाची बागेत लागवड केली.
यातून त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळालं. दुसऱ्या वर्षी मग कपाशी लावली. गेल्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळाला असल्याने यातून त्यांना चांगली कमाई देखील झाली. दरम्यान यावर्षी त्यांनी बागेत रब्बी हंगामात गव्हाची पेरणी केली आहे. विशेष म्हणजे बागेत गहू चांगलाच बहरला आहे. यामुळे यातूनही त्यांना बऱ्यापैकी कमाई होण्याची आशा आहे. तीनही वर्ष बागेत आंतर पिकातून त्यांना चांगली कमाई झाली आहे.
गणेश सांगतात की त्यांना शेतीकामात त्यांच्या परिवाराचा देखील मोठा हातभार लागत असतो. यामुळे शेती व्यवसायात त्यांना चांगली कमाई होत आहे. दरम्यान गणेश यांनी केलेला हा प्रयोग पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरत असून इतर प्रयोगशील शेतकरी त्यांच्या बांधावर हजेरी लावत त्यांच्या या प्रयोगाची माहिती जाणून घेत आहेत.