मोठी बातमी ! विखे यांचे फेक अकाउंट तयार करून ज्येष्ठ कलावंत बाबासाहेब सौदागर यांची हजारो रुपयांची फसवणूक ! पोलिसात तक्रार दाखल

Ahmednagar News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. असेच एक सायबर गुन्हेगारीचे प्रकरण समोर आले आहे ते आपल्या श्रीरामपुरातून. श्रीरामपूर येथील प्रसिद्ध चित्रपट गीतकार तथा राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेलचे खानदेश विभागीय अध्यक्ष बाबासाहेब सौदागर यांची हजारो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

यासंदर्भात सौदागर यांच्या माध्यमातून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाने एक फेक फेसबुक अकाउंट तयार करून अज्ञात इसमाने सौदागर यांची 65 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

यासंदर्भात सौदागर यांच्या मार्फत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. सौदागर यांच्या जावयाने ही तक्रार पुणे पोलीस सायबर ब्रांचला दाखल केली आहे. खरेतर सौदागर यांना फेसबुकवर राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाने एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. यानंतर सौदागर आणि त्या सदर अज्ञात इसमामध्ये मॅसेजवर बोलणे झाले.

विखे पाटील यांच्या नावाने तयार झालेल्या फेक अकाउंट वरून सौदागर यांचा व्हाट्सअप नंबर मागितला गेला. त्यानंतर व्हाट्सअप वर विखे यांनी संतोष कुमार नावाचे माझे आर्मी ऑफिसर मित्र आहेत. त्यांचे ट्रान्सफर झाले असल्याने त्यांच्या घरातील फर्निचर द्यायचे आहे. यानंतर सदर व्यक्तीने संतोष कुमार नावाच्या व्यक्तीचा फोन नंबर त्यांना पाठवला.

विखे पाटील सारख्या प्रतिष्ठित माणसाने आपल्याला मोबाईल नंबर पाठवला आहे यामुळे सौदागर यांनी सहजचं विश्वास ठेवला आणि सदर व्यक्तीशी संपर्क साधला. यानंतर दोघांमध्ये फर्निचरचा व्यवहार पूर्ण झाला आणि 50 हजार रुपयांमध्ये फर्निचर देण्याचे ठरले. याबाबत सौदागर यांनी त्यांच्या जावयाला सांगितले. त्यानंतर संतोष कुमार नावाच्या व्यक्तीला दहा हजार रुपये पाठवलेत.

मात्र ते पैसे मिळाले नसल्याचे कुमार यांनी सांगितले. यामुळे पुन्हा दहा हजार रुपये पाठवलेत त्यावेळी कुमार यांनी पैसे मिळालेत असे सांगितले. यानंतर संतोष कुमार यांनी फर्निचर भरून गाडी निघाली असून गाडी संगमनेर तालुक्यातील समनापुर येथे आली असल्याचे म्हटले. पण संतोष कुमार यांनी पुन्हा 32 हजार रुपयांची मागणी केली.

आर्मीचे रुल खूप कडक असतात असे म्हणत कुमार यांनी 32 हजार रुपयांची मागणी केली आणि जर पैसे दिले नाहीत तर गाडी पुढे जाणार नाही असे सांगितले. म्हणून सौदागर यांनी विखे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधत सदर घटनेची माहिती दिली.

यावेळी मात्र विखे यांनी माझं तुमच्याशी कधीही बोलणं झालेले नाही, मी तुम्हाला कोणाचाच नंबर दिलेला नाही असे म्हटले. त्यानंतर सौदागर यांना धक्का बसला. त्यांना आपली फसवणूक झाली असल्याचे समजले आणि त्यांनी ताबडतोब यासंदर्भात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली याबाबत तक्रार दाखल करण्यास सांगितले. दरम्यान श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी कात्रज पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा नोंदवण्यास सांगितले. यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकंदरीत सायबर गुन्ह्याचा विळखा हा दिवसेंदिवस वाढत आहे.

चांगल्या प्रतिष्ठित लोकांच्या नावाने फेक आयडी बनवून लोकांची फसवणूक केली जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही अज्ञात इसमावर सहजासहजी विश्वास ठेवण्याऐवजी सर्वप्रथम त्या व्यक्तीची योग्य माहिती घेऊनच कोणताही व्यवहार केला पाहिजे अन्यथा फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.