Ahmednagar News : जिल्ह्यात मिशन जलजीवनची कासवगती; तब्बल ७१८ पाणीयोजनांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जल जीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत “हर घर नल से जल” या उद्देशाने ग्रामीण भागातील सर्व कुटूंबाना वैयक्तीक नळ जोडणीद्वारे ५५ लिटर प्रतिदिन प्रतिव्यक्ती पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.

त्यानुसार मार्च २०२४ पर्यंत सर्व मंजूर पाणीयोजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट होते. मात्र, या वेळेत हि कामे पूर्ण होणे शक्य नसल्याने राज्य शासनाने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यापैकी दोन महिने आता सरले असून उर्वरित चार महिन्यात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागासमोर ८३० पैकी ७१८ पाणीयोजनांची अर्धवट कामे पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलजीवन मिशनची ओळख आहे. प्रत्येक नागरिकाला मुबलक शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, हा उद्देश समोर ठेवून केंद्र सरकारने हा उपक्रम हाती घेतला. २०२० पासून या उपक्रमाला सुरुवात झाली.

नगर जिल्ह्यात ८३० पाणीयोजनांसाठी १ हजार ३३८ कोटींचा निधी केवळ जिल्हा परिषदेच्या मार्फत करण्यात येणाऱ्या स्वतंत्र पाणीयोजनांसाठी उपलब्ध झाला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ११२ प्रादेशिक पाणीयोजनांची कामे करण्यात येत असून, त्यासाठी साडेतीन हजार कोटी निधी आहे.

म्हणजे नगर जिल्ह्याला पाच हजार कोटी निधी केवळ जनजीवन मिशन पाणीयोजनांसाठी उपलब्ध झाला आहे. मात्र अद्यापही योजनांची कामे पूर्ण झालेली नाही. जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन मिशनअंतर्गत ८३० योजना मंजूर झाल्या असून त्या योजनांच्या माध्यमातून ९२७ गावांना नळाव्दारे प्रतिमाणसी ५५ लीटर गुणवत्तायुक्त पेयजल प्रतिदिन वितरित करण्याचे उद्दीष्ट आहे.

१५ ऑगस्ट २०२३ रोजी २२५ पाणीयोजनांची यशस्वी चाचणी करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात १५ ऑक्टोबरला ७५ पाणीयोजनांची चाचणी करण्यात आली. अशा ३०० पाणीयोजनांची चाचणी झाली, मात्र त्यानंतर आतापर्यंत मे महिन्या अखेरपर्यंत केवळ ११२ पाणीयोजना पूर्ण झाल्या आहेत.

ज्या ३०० पाणीयोजनांची चाचणी झाली, त्या मार्च २०२४पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. जलजीवन मिशनचे काम कासवगतीने सुरु आहे, त्यामुळे अडीच वर्षात केवळ ११२ योजना पूर्ण झाल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News