मिरची लावली तर लक्ष ठेवा ‘अँथ्रॅकनोज’ या रोगावर; मिरची पिकाचे करतो 50 ते 100% पर्यंत नुकसान! अशाप्रकारे करा उपाययोजना

Published on -

भाजीपाला पिकांमध्ये मिरची हे पिक खूप महत्त्वाचे असून महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड केली जाते. परंतु मिरची व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून बघितले तर अनेक प्रकारचे रोगांचा प्रादुर्भाव होताना आपल्याला दिसून येतो व यामध्ये प्रामुख्याने मर रोग व सोबतच अँथ्रॅकनोज आणि इतर जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.

त्यामुळे वेळीच व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते. नाहीतर रोगांमुळे मिरची पिकाचे अतोनात नुकसान होऊन उत्पादनाला फटका बसतो व साहजिकच त्यामुळे आर्थिक फटका देखील शेतकऱ्यांना बसतो.

यापैकी अँथ्रॅकनोज हा रोग खूप नुकसानदायक असून तो प्रामुख्याने मिरचीची पाने, झाडावर पिकलेली मिरची म्हणजेच फळ आणि फांद्यांवर प्रामुख्याने येतो व त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. हा एक बुरशीजन्य प्रकाराचा मिरची वरील रोग असून यामुळे मिरची पिकाचे 50 ते 100% पर्यंत देखील नुकसान होते.

 काय आहेत अँथ्रॅकनोज रोगाची लक्षणे?

1- या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर मिरचीची पाने तसेच खोड व फांद्यांवर याचा परिणाम दिसून येतो व कोणत्याही अवस्थेमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

2- मिरचीच्या नवीन रोपांवर जर या रोगाची लक्षणे दिसायला लागली तर सगळ्यात अगोदर रोपाची पहिली पाने रोगग्रस्त होऊन संपूर्ण रोप मरते.

3- मिरचीच्या झाडाच्या फांद्यांवर डायबॅकची लक्षणे दिसून पाने व फुले गळायला लागतात व फांद्या वाळतात. फांद्यांवर जर याचा प्रादुर्भाव असला तर फांद्यांची टोके जळालेली दिसतात व नंतर पूर्ण फांदी सुकून जाते.

4- जेव्हा पानांवर याचा प्रादुर्भाव दिसून येतो तेव्हा अगदी सुरुवातीला तुरळक तपकिरी रंगाचा एक लहान ठिपका दिसतो. नंतर हा ठिपका वाढत जाऊन एक सेंटीमीटर पर्यंत वाढतो. त्या ठिपक्याचा भाग राखाडी तसेच कडा या गर्द काळ्या किंवा तपकिरी रंगाच्या असतात.

5- तसेच या रोगाचा प्रादुर्भाव हिरव्या मिरची म्हणजेच झाडावरील हिरव्या फळांवर देखील दिसायला लागतो. जोपर्यंत फळ पिकत नाही तोवर याची कुठलीही प्रकारचे लक्षण आपल्याला दिसून येत नाही. हिरव्या फळावर म्हणजेच हिरव्या मिरचीवर गोलाकार वर्तुळ तयार झाल्याचे दिसून येते व त्या वर्तुळांच्या मध्यभागी एक पांढरा ठिपका दिसतो व त्या भोवती आपल्याला वलय दिसतात.

6- वातावरणामध्ये जर आद्रता असेल तर गुलाबी किंवा भगव्या रंगाची बिजाणू देखील दिसतात.

 या हवामानात जास्त होतो प्रादुर्भाव

जर उष्ण व आद्रतायुक्त वातावरण असेल तर मिरची पिकावर या रोगाची लागण होते. साधारणपणे 80 ते 90% आद्रता व 20 ते 27 अंश सेल्सिअस तापमानामध्ये पाने किंवा फळे ओली राहत असेल तर या रोगाची लागण होते.

तसेच वातावरणामध्ये धुके किंवा दव असेल तर हा रोग जास्त प्रमाणात येऊ शकतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर या रोगाची बिजाणू रोगग्रस्त फळे व पानांवर झपाट्याने तयार व्हायला लागतात व पुढे वेगात रोगाचा प्रसार होतो.

 नियंत्रणासाठी काय कराल उपाय?

1- महत्वाचे म्हणजे मिरची लागवडीकरिता रोगमुक्त बियाण्याचा वापर करावा.

2- बियाणे शिफारसी प्रमाणे बीज प्रक्रिया करून घ्यावी व दोन ओळीतील अंतर प्रामुख्याने जास्त ठेवावे.

3- पिकाची फेरपालट करून घ्यावी. तसेच या रोगाचे जे काही यजमान पीक आहेत ते म्हणजे मिरची तसेच टोमॅटो, बटाटा, कांदा, कपाशी, झेंडू, आले तसेच गवार व चवळी इत्यादी पिकांची लागवड या अगोदर केलेली असेल तर त्या ठिकाणी मिरची पीक घेणे टाळावे किंवा पीक फेरपालट करावी.

4- मिरचीची काढणी योग्य वेळी पूर्ण करावी तसेच पिकलेली फळे लवकर काढून नष्ट करावीत.

5- तसेच प्रादुर्भावग्रस्त पाने व फळे व इतर भाग त्वरित तोडून नष्ट करून घ्यावा.

6- शिफारसीत बुरशीनाशकांचा वापर करावा.

7- तसेच जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यावी. तसेच सुडोमोनस बॅॅसिलस सारख्या जैविक घटकांचा पंधरा ते वीस दिवसांनी वापर करावा.

 ही आहेत शिफारशीत बुरशीनाशके

डायफेनोकोनॅझोल ( 11.4% डब्ल्यू/ डब्ल्यू एससी), कॉपर ऑक्सिक्‍लोराईड( 50% डब्ल्यूपी), डायफेनोकोनॅझोल( 25% इसी), हेक्‍झाकोनेझोल( 75% डब्ल्यू जी), टेब्यूकोनॅझोल( 25.9% इसी), थायोफॅनेट मिथाईल( 41.7% एससी) हे काही शिफारशीत बुरशीनाशके यावर फायदेशीर ठरतात.

( पिकांवर कुठलीही फवारणी करणे अगोदर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe