सध्या प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला स्मार्टफोन दिसून येतो. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांपासून तर वृद्धांपर्यंत मोठ्या प्रमाणावर आता स्मार्टफोन वापरले जात आहेत. परंतु हे एक गॅझेट असल्यामुळे त्याचा वापर हा काळजीपूर्वक करणे तितकेच गरजेचे असते. आपल्या काही चुका स्मार्टफोनमध्ये बिघाड करू शकतात व त्यामुळे आपल्या खिशाला आर्थिक फटका बसतो.
त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. जर आपण स्मार्टफोनमध्ये असणारी कॉमन समस्या म्हणजे सामान्य गोष्ट पाहिली तर ती म्हणजे स्मार्टफोनची बॅटरी खराब होणे होय. नवीन स्मार्टफोन घेतल्यानंतर अगदी काही वेळा दोन ते तीन महिन्यानंतरच बॅटरी काही प्रकारच्या समस्या द्यायला लागते.
कधी ती चार्ज व्हायला खूप वेळ घेते किंवा चार्ज लवकर उतरते. अशा प्रकारच्या सामान्य समस्या दिसून येतात. याबाबत जर आपण पाहिले तर साधारणपणे आपल्या हातून काही छोट्याशा चुका घडलेल्या असतात व त्यामुळेच बॅटरीची समस्या निर्माण होते. याकरिता आपण या लेखात अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्यामुळे बॅटरीचे नुकसान होऊ शकते? याबद्दल माहिती घेणार आहोत.
या छोट्या चुका टाळा आणि स्मार्टफोनच्या बॅटरीचे आयुष्य वाढवा
1- स्मार्टफोन चार्जिंग करण्याची पद्धत– जेव्हा आपण स्मार्टफोन चार्ज करतो तेव्हा आपल्या हातून काही छोट्या चुका घडत असतात व त्या चुकांमुळे बॅटरीवर किंवा बॅटरीच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो याची आपल्याला माहिती नसते.
बऱ्याच जणांना त्यांचा स्मार्टफोन वारंवार चार्ज लावायची सवय असते. तुम्ही अशा पद्धतीने फोन वारंवार चार्ज लावत असाल तर यामुळे देखील बॅटरी खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ही सवय जर तुम्हाला असेल तर तुम्ही ती तात्काळ बंद करणे गरजेचे आहे.
2- मूळ चार्जर ऐवजी दुसऱ्या चार्जरने स्मार्टफोन चार्ज करणे– जेव्हा आपण दुकानावर स्मार्टफोन खरेदी करतो त्यासोबत आपल्याला एक पूर्ण किट येते व त्यामध्ये चार्जर देखील येतो व हे स्मार्टफोनसाठी असलेले मूळ चार्जर असते.
परंतु कालांतराने जेव्हा हे मूळ चार्जर खराब होते किंवा ते हरवते तेव्हा आपण दुसऱ्या चार्जर वरून स्मार्टफोन चार्ज करायला सुरुवात करतो. परंतु असे केल्याने देखील बॅटरी खराब होण्याची शक्यता असते.
3- सॉफ्टवेअर अपडेट करणे– स्मार्टफोन मधील बॅटरी आणि सॉफ्टवेअर यामध्ये कुठलाही संबंध नसतो असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीच आहे. जर स्मार्टफोन सध्याच्या सॉफ्टवेअरवर वापरला जात नसेल तर त्यामुळे देखील बॅटरी लवकर संपते आणि खराब होण्याची शक्यता देखील वाढते.
तसेच स्मार्टफोनला वेळेवर अपडेट न केल्यामुळे देखील अति उष्णतेची म्हणजेच स्मार्टफोन गरम होण्याची समस्या देखील दिसून येते. त्यामुळे सॉफ्टवेअर अपडेट करणे खूप गरजेचे आहे.
4- स्मार्टफोन रात्रभर चार्जिंगला लावणे– बऱ्याच जणांना सवय असते की स्मार्टफोन रात्री झोपताना चार्ज लावतात व सकाळी चार्ज काढतात. परंतु स्मार्टफोन रात्रभर चार्ज लावण्याची चूक करू नये. आता बाजारपेठेत असे अनेक स्मार्टफोन आलेले आहेत की ते तंत्रज्ञानाने सुसज्ज असून त्यांना तुम्ही अनेक तास चार्ज लावले तरी हरकत नाही. परंतु रात्रभर स्मार्टफोन चार्ज लावू नये हेच फायद्याचे आहे.