Cotton Farming : कपाशी हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची शेती खानदेशात मोठ्या प्रमाणात होते. खानदेशातील जळगाव जिल्ह्याचे बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण कापूस पिकावर अवलंबून आहे. यासोबतच याची लागवड मराठवाडा आणि विदर्भ विभागात देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. दरम्यान, आता खानदेशासहित, मराठवाडा आणि विदर्भ विभागातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या अनुषंगाने देशातील शास्त्रज्ञ नवनवीन कापसाच्या जाती विकसित करत असतात. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच काही कालावधीपूर्वी महाराष्ट्रासह देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापसाच्या दोन नवीन जाती विकसित झाल्या आहेत. दरम्यान आज आपण याच दोन नवीन जातींची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कापसाच्या नव्याने विकसित झालेल्या जाती
शालिनी (CNH 17395) (CICR-H कॉटन 58) : कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या अनुषंगाने ICAR सेंट्रल कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर या संस्थेमधील शास्त्रज्ञांनी कापसाची ही जात विकसित केली आहे. ही कापसाची एक संकरित जात असून यापासून शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळत आहे.
पावसाच्या पाण्यावर आधारित कापूस लागवड जे शेतकरी करतात त्यांच्यासाठी हा वाण फायद्याचा ठरणार आहे. जिरायती भागात लागवडीसाठी हा वाण उपयुक्त असल्याचा दावा केला जातो. कापसाची ही जात वेगवेगळ्या रोगांमध्ये प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीचा कापूस 127 दिवसात काढणीसाठी तयार होतो.
या जातीपासून सरासरी 14 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगाना या राज्यांमध्ये या जातीच्या कापसाची लागवड करण्याची शिफारस करण्यात आली आहे. अर्थातच फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील इतरही प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमधील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून कापसाची ही नवीन जात फायदेशीर ठरणार आहे.
पीडीकेव्ही धवल : कापसाची ही देखील एक सुधारित जात आहे. ही जात महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारशीत आहे. राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि खानदेशातील हवामान या जातीच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विदर्भातील प्रमुख कृषी विद्यापीठाने ही जात विकसित केली आहे.
ही जात वेगवेगळ्या कीटकांसाठी आणि रोगांसाठी प्रतिरोधक आहे. ही जात जवळपास 170 ते 180 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होते. या जातीपासून सरासरी 13 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. महाराष्ट्रासोबतच गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये देखील या जातीची लागवड करता येणे शक्य आहे.