भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो हे भारतातील एक नामांकित संस्था असून अवकाश संशोधनामध्ये या संस्थेचे भरीव अशी कामगिरी राहिलेली आहे. नुकतेच 23 ऑगस्टला चांद्रयान तीनची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करून भारताचे नाव सुवर्णाक्षरात कोरले गेले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला. चंद्रयान मोहीम यशस्वी करण्याकरिता बऱ्याच वर्षापासून शास्त्रज्ञांनी मेहनत घेतली व त्यांच्या मेहनतीला आता फळ मिळाले.
यामध्ये प्रयत्न करण्यात आले किंवा जी काही तयारी करण्यात आली यामध्ये पृथ्वीवरील एका ठिकाणाच्या मातीची शास्त्रज्ञाना खूप मोठ्या प्रमाणावर मदत झाली. आता तुम्ही म्हणाल की नेमकी पृथ्वीतलावरील माती आणि चंद्रयान मोहिमेचा काय संबंध? त्यामुळे याचीच महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
चंद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वीतेमध्ये या ठिकाणची माती पडली उपयोगी
जर आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा विचार केला तर या ठिकाणी जी माती आहे त्या मातीची गरज शास्त्रज्ञांना होती. कारण विक्रम लँडर ज्या ठिकाणी लँड होणार होते त्या ठिकाणच्या पृष्ठभागाची प्रतिकृती तयार करून चाचणी घेणे खूप गरजेचे होते. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या प्रकारची माती असते त्याच प्रकारची माती याकरिता आवश्यक होती.
विशेष म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या प्रकारची माती सापडते त्याच प्रकारची माती तामिळनाडू राज्यातील नामक्कल जिल्ह्यात मिळते. कारण चंद्राचा जो काही पृष्ठभाग आहे तो एनोर्थसाईट प्रकारच्या खडकांचा बनलेला आहे याच प्रकारचे खडक तामिळनाडू राज्यातील नामक्कल जिल्ह्यातील चित्तमबोंडी आणि गुन्नामलाई या भागांमध्ये देखील आढळून येतात. साधारणपणे 1950 च्या सुमारास हे खडकांचा शोध या ठिकाणी लागला.
कारण याच प्रकारच्या खडकांनी चंद्र बनला व त्या सुमारास देखील पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे अभ्यासकांनी या खडकामध्ये जे काही क्षार आढळून येतात त्यांचा देखील अभ्यास केला. त्यानंतर साधारणपणे सत्तरच्या दशकात अमेरिकेने अपोलो चंद्र मोहिमा राबवण्याचे ठरवले व त्यातूनच पुढे समजले की चंद्रावर देखील एनॉर्थसाईट खडक आणि बेसॉल्ट मातीने बनलेले खडक आहेत. त्यानंतर आपल्या भारताने देखील चंद्रयान मोहिमा आखण्यास सुरुवात केली.
परंतु भारताला देखील चाचणी करिता या खडकांची माती आवश्यक होती. त्यामुळे अमेरिकेतून ही माती मागवावी लागली व ती प्रचंड किमतीत आपल्याला मिळाली.त्यामुळे चंद्रयान मोहिमेचे जे काही प्रोजेक्ट डायरेक्टर होते त्यांचे नाव मलयस्वामी अण्णादुराई असे होते. त्यांनी त्यावेळी भू वैज्ञानिकांचा सल्ला घेऊन अशा प्रकारची माती भारतात आहे का हे शोधायचे ठरवले. त्यानंतर इस्रोच्या माध्यमातून आयआयटी मुंबईच्या जिओ इन्फॉर्मेशन ऍस्ट्रॉनॉमिक सेंटरमध्ये अभ्यासक असलेले अंबळगन यांच्याशी कॉन्टॅक्ट केला गेला व त्यांच्या टीमने तामिळनाडू राज्यातील चित्तमबोंडी मधील माती ही चंद्रावरच्या मातीशी जवळजवळ 99% सारखी आहे असे सिद्ध केले व हा अभ्यास त्यांच्या टीमने 2004 यावर्षी पूर्ण केला.
त्यानंतर 2012 व 13 या वर्षी चित्तमबोंडी मधले एनॉर्थसाईट दगड घेऊन ते भरडले गेले व त्यांची माती तयार करून 50 टन माती इस्रोकडे पाठवण्यात आली. विशेष म्हणजे याच मातीवर चंद्रयान 2 ठेवण्यात आले होते व त्याच ठिकाणी त्याच्या चाचण्या देखील करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे याच प्रकारच्या मातीवर आता चंद्रयान 3 च्या देखील चाचण्या करण्यात आल्या. अशाप्रकारे तामिळनाडू राज्यातील नामक्कल जिल्ह्यातील या मातीचा संबंध या मोहिमेशी आहे.