Farmer Success Story: गणेश भाऊंनी घेतले थेट ब्राझीलच्या सोयाबीनचे उत्पादन! एकरी 30 क्विंटल उत्पादन मिळण्याचा अंदाज, वाचा यशोगाथा

शेती क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर सध्या होत असल्यामुळे तसेच देशातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून दर्जेदार आणि उत्पादनक्षम असे बियाणे विकसित केला गेल्यामुळे आता शेतकऱ्यांना कमीत कमी क्षेत्रात भरघोस उत्पादन मिळवणे शक्य झालेले आहे.

Published on -

Farmer Success Story:- शेती क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर सध्या होत असल्यामुळे तसेच देशातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून दर्जेदार आणि उत्पादनक्षम असे बियाणे विकसित केला गेल्यामुळे आता शेतकऱ्यांना कमीत कमी क्षेत्रात भरघोस उत्पादन मिळवणे शक्य झालेले आहे.

शेती क्षेत्राची दुसरी जमेची बाब जर पाहिली तर ती म्हणजे शेतीकडे आता मोठ्या प्रमाणावर उच्चशिक्षित असे तरुण वळल्याने अनेक नवनवीन संकल्पना शेतीमध्ये या तरुणांच्या माध्यमातून राबवल्या जात असल्याने आता शेती खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जात आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण केज तालुक्यातील ढाकेफळ या गावचे तरुण शेतकरी गणेश परमेश्वर थोरात यांची यशोगाथा बघितली तर हे एक प्रयोगशील शेतकरी आहेत. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असताना त्यांना यावर्षी सोयाबीन लागवड करण्याकरिता ब्राझीलचे सोयाबीन पीक घ्यावे असा मनामध्ये विचार आला

व त्यांनी ब्राझीलच्या सोयाबीनची लागवड केली व व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवून त्यांना त्यापासून एका एकर क्षेत्रातून तीस क्विंटल पर्यंत उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे व चांगले दर जर मिळाले तर एका एकर मधून जवळपास दीड लाखापर्यंतचे आर्थिक उत्पन्न त्यांना मिळणार आहे.

 अशाप्रकारे केले ब्राझीलच्या सोयाबीनचे नियोजन

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या ढाकेफळ या गावचे प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले गणेश परमेश्वर थोरात यांनी या खरीप हंगामामध्ये ब्राझीलचे सोयाबीन लागवडीचा प्रयोग करण्याचे ठरवले. याकरिता त्यांनी सातारा येथून ब्राझील सुपर नावाचे तीन किलो सोयाबीनचे बियाणे आणले व जून महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर एक एकर क्षेत्रावर त्यांनी लागवड केली.

लागवड करताना त्यांनी चार फूट रुंद आणि चार फूट लांब आणि अडीच फूट अंतरावर कपाशीसारखी सोयाबीन बियाण्याची टोकन पद्धतीने लागवड केली. ब्राझीलच्या या सोयाबीन व्हरायटीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही  वरायटी सोयाबीन वरील घातक असलेल्या येलो मोझॅक रोगाला बळी पडत नाही व त्यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाचतो.

तसेच या व्हरायटीवर रोग आणि किडींचा देखील जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत नसल्याने केवळ चार वेळा  गणेश थोरात यांनी फवारणी केली. आज जर त्यांच्या शेतातील पिकाची स्थिती पाहिली तर एका झाडाला तब्बल 1000 पेक्षा अधिक शेंगा लगडल्या असून या माध्यमातून त्यांना एका एकर मध्ये 30 क्विंटल उत्पादन मिळण्याची अपेक्षा असून त्या माध्यमातून दीड लाख रुपयांचे उत्पन्न पदरात पडेल.

या सगळ्या एक एकर ब्राझील सोयाबीन करिता त्यांना एकूण 23 हजार 900 रुपये इतका खर्च एकरी आला. या खर्चामध्ये प्रामुख्याने तीन किलो बियाण्याकरिता सहा हजार सहाशे रुपये, लागवडीसाठी लागणारी मजुरी आठशे रुपये तसेच, खतांच्या तीन बॅग करिता 4500 तर औषध फवारणी करिता बारा हजार रुपये असे मिळून एकरी 23 हजार 900 रुपये इतका खर्च आला.

 ब्राझील सोयाबीनची लागवडच का?

सोयाबीन लागवड करण्याकरिता ब्राझील सोयाबीनच्या व्हरायटीची निवड करण्यामागील प्रमुख कारण म्हणजे गणेश थोरात एकदा बारामती येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनाला गेले होते व त्या ठिकाणी साताऱ्याच्या एका शेतकऱ्याने ब्राझील सोयाबीनचे एक झाड प्रदर्शनामध्ये ठेवलेले होते व त्या शेतकऱ्यापासूनच गणेश थोरात यांनी प्रोत्साहन घेतले व त्या शेतकऱ्याशी संपर्क करून बियाणे मिळवून ब्राझील जातीच्या सोयाबीनची लागवड केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News