Women Success Story:- स्त्री म्हटले म्हणजे फक्त चूल आणि मूल ही जी काही संकल्पना होती ती काळाच्या ओघात कधीच मागे पडली असून प्रत्येक महिला आता कुठल्याही क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर पुरुषांच्या एक पाऊल पुढे चालत आपल्याला काम करताना दिसून येत आहे.
आता असे कुठलेही क्षेत्र राहिलेले नाही की त्यामध्ये महिलांचा समावेश नाही. देशाचे संरक्षण क्षेत्र असो की राजकीय क्षेत्र, संशोधन क्षेत्र असो की आणखी कुठलेही क्षेत्र यामध्ये उच्च पदांवर सध्या महिला कार्यरत असल्याचे दिसून येते.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून उचलण्यात आलेले महत्त्वाची पावले देखील यासाठी खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. शेती क्षेत्र असो किंवा एखादा व्यवसाय यामध्ये देखील आता महिला खूप यशस्वी झाल्या असून महिला बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी मोठ-मोठे व्यवसाय देखील आता उभे केले आहेत.
अगदी महिलांच्या यशाच्या याच अनुषंगाने जर आपण अकोल्यातील चार मैत्रिणीची यशोगाथा बघितली तर ती देखील इतकीच प्रेरणादायी अशी आहे. कोरोना कालावधीत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सेवा म्हणून एक छोटस हॉटेल या चार मैत्रिणींनी एकत्र येत सुरू केले. परंतु आज या हॉटेलने खूप मोठी भरारी घेतली असून त्यांचे हे सुगरणीच किचन नावाची हॉटेल आज संपूर्ण परिसरामध्ये प्रसिद्ध झालेली आहे.
चार मैत्रिणींनी एकत्र येत सुरू केली हॉटेल
अकोल्यातील अनघा दीक्षित, प्रांजली हरकरे, आशा मानकर आणि अंजली अतकरे या चौघ्या मैत्रिणींनी कोरोना कालावधीत असलेल्या लॉकडाऊन मध्ये सेवा स्वरूपामध्ये एक छोटेसे हॉटेल सुरू केले होते व याच हॉटेलने आज मोठी भरारी घेतलेली असून त्यांनी सुरू केलेले सुगरणीचा किचन हे हॉटेल आज नावारूपाला आलेले आहे.
या हॉटेलचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व महिला कर्मचारी कामाला असून या माध्यमातून महिलांना देखील रोजगार उपलब्ध झालेला आहे. जेव्हा कोरोना कालावधीमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला तेव्हा गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
कित्येक कुटुंबांमधील सदस्य हे कोरोनामुळे आजारी होते तर काही कुटुंबांना तर एक वेळ जेवणाची देखील सोय नव्हती. अशा परिस्थितीमध्ये अकोल्यातील या चारही मैत्रिणी एकत्र आल्या व घरचे साहित्य घेऊन काहीतरी सेवा करावी म्हणून छोटसं किचन सुरू केले.
या माध्यमातून त्यांनी पार्सल सुविधा सुरू केली व अनेकांची त्यामुळे जेवणाची सोय झाली. त्यांच्या या छोट्याशा किचनमध्ये सर्व स्वरूपाची काम या चार मैत्रिणी अगोदर करत होत्या व हळूहळू या छोट्याशा किचनचे रूपांतर त्यांनी मोठ्या अशा रेस्टॉरंटमध्ये केले.
त्यांच्या या हॉटेलमध्ये 15 महिला कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला असून हॉटेल मधील अगदी पानाची टपरी देखील महिला चालवतात. या व्यवसायातून या चार मैत्रिणी स्वतः आर्थिक सक्षम झाल्याच परंतु इतर महिलांना रोजगार देऊन आर्थिक दृष्टिकोनातून त्यांना देखील स्वावलंबी करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.
या ठिकाणी ज्या 15 महिला काम करतात त्यांच्या पगारातून दर महिन्याला एखाद्या कंपनीत ज्याप्रमाणे पीएफ कापला जातो त्याप्रमाणे पाचशे रुपये जमा केले जातात व हे जमा केलेले पाचशे रुपये त्या महिलांना जर कुठली आर्थिक गरज उद्भवली तर त्यावेळेस दिले जातात.
या सुगरणीचा किचन या हॉटेलमध्ये घरगुती स्वरूपाचे जेवण मिळते. तसेच या त्यांच्या रेस्टॉरंटचे वातावरण घरगुती असल्यामुळे महिला वर्गाला देखील अगदी सुरक्षिततेची भावना या ठिकाणी मिळते. या ठिकाणाच्या जेवणाची चव चाखण्यासाठी लांबून लोक जेवायला येतात. या ठिकाणी जेवायला आलेल्या लोकांना घरगुती जेवणाचा आस्वाद तर मिळतोच परंतु घरगुती वातावरण देखील अनुभवता येते.
या चारही जणींनी मसाला उद्योगात केलं पदार्पण
तसेच या चारही मैत्रिणींनी हॉटेल व्यवसायासोबतच घरगुती मसाले बनवायला सुरुवात केली असून हे मसाले बनवण्यासाठी 20 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावरच त्यांनी या मसाल्यांचं लॉन्चिंग केलं आहे.
हॉटेल व्यवसायामध्ये पुरुषांची मक्तेदारी आपल्याला दिसून येते. परंतु या व्यवसायात देखील या चार मैत्रिणींनी यश मिळवून हम भी किसीसे कम नही हे वाक्य जणू काही खरं करून दाखवल आहे.