शेती म्हटले म्हणजे निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय व याच कारणामुळे आज देखील अनेक तरुण उच्च शिक्षण घेतात व एखाद्या छोट्या मोठ्या नोकरीत समाधान मानतात. कारण आपल्याला माहित आहे की,निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व आर्थिक तोटा सहन करावा लागतो.
निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेती व्यवसाय हा बिन भरवशाचा व्यवसाय समजला जातो. परंतु आता शेती बद्दलची ही मानसिकता हळूहळू बदलत असून अनेक सुशिक्षित तरुण आता शेतीमध्ये पाऊल ठेवून शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याची पद्धत आणि विविध पिकांची लागवड या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतीत प्रगती करत आहे.

त्याला धरून जर आपण जालना जिल्ह्यात असलेल्या संगमपुर या गावचे रहिवासी गणेश लहाने या तरुण शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर शेतीत प्रगती कशी करता येते हे समजून घेता येईल.
गणेश लहाने यांनी शेतीतून साधली आर्थिक समृद्धी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील संगमपुर या गावचे रहिवासी असलेले गणेश लहाने त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी बीएड पूर्ण केलेले आहे.
परंतु त्यानंतर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये लिपिक पदावर काम देखील केले व त्यासोबत शेती व्यवसाय सुरू केला. त्यांनी अगोदर पारंपरिक शेतीला सेंद्रिय शेतीची जोड दिली.
आता ते पूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती करतात व प्रामुख्याने या शेतीमधून कापूस, मका आणि कांद्याचे पीक घेतात. विशेष म्हणजे या सेंद्रिय शेती मधून ते वर्षाकाठी 15 लाख रुपयाहून अधिकचे उत्पन्न मिळवत आहेत.
त्यांच्या या शेती पद्धतीमध्ये ते सेंद्रिय खतांचा वापर तसेच पाण्याची व्यवस्थापन व शेणखत, गांडूळ खताचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. सेंद्रिय पद्धतीने त्यांनी त्यांची शेती फुलवली असून यामुळे शाश्वत उत्पादन मिळण्यास त्यांना मदत झाली आहे.
सेंद्रिय शेतीला दिली जोडधंद्याची साथ
सेंद्रिय पद्धतीने शेती करायचे म्हटले म्हणजे त्यासाठी गोमूत्र तसेच शेणखताची आवश्यकता भासते. यासाठी त्यांनी गायी व म्हशीचे पालन करायला सुरुवात केली. या माध्यमातून दुधाचे उत्पादन देखील त्यांना मिळायला लागले व त्यातून देखील त्यांना आर्थिक उत्पन्न मिळते.
विशेष म्हणजे त्यांचा उत्पन्नाचा एक वेगळा स्त्रोत पाहिला तर तो देखील खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्या विहिरीला बारमाही पाणी असल्यामुळे त्यांनी त्यांच्या गावातील 50 ते 60 घरांना पाणीपुरवठ्याची सोय केली आहे व त्याकरिता या घरापर्यंत त्यांनी पाईपलाईन करून पाण्याचा पुरवठा देखील केलेला आहे व या माध्यमातून ते वर्षाला प्रतिघर तीन हजार रुपये अशाप्रकारे पैशांचे आकारणी करून त्या माध्यमातून देखील चांगले उत्पन्न मिळवतात.
आज गणेश हे सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून कापूस, कांदा तसेच मक्याचे उत्पादन घेतात व या पिकांपासून वार्षिक पंधरा लाखांची कमाई करण्यात ते यशस्वी झालेले आहेत.