महाराष्ट्र मध्ये जर आपण पिकांच्या बाबतीत बघितले तर आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात विविधता दिसून येते व काही जिल्हे ही विशिष्ट पिकांकरिता प्रामुख्याने ओळखले जातात. उदाहरण घ्यायचे झाले तर ज्याप्रमाणे विदर्भातील बहुसंख्य जिल्हे हे संत्रा आणि मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
अगदी त्याचप्रमाणे खानदेशातील जळगाव जिल्हा हा केळीचा आगार म्हणून प्रसिद्ध आहे व त्यासोबतच नाशिक जिल्ह्याची ओळख ही द्राक्ष, कांदा आणि डाळिंब पिकासाठी आहे. परंतु आता पिकांमधील असलेली ही जिल्हा नुसार विविधता आपल्याला कमी होताना दिसून येत आहे.

कारण शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे आणि आधुनिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने कोणत्याही ठिकाणी कुठल्याही पिकांची लागवड शेतकरी करू लागल्या आहेत व इतकेच नाही तर ती लागवड यशस्वी देखील करत आहे. अगदी याचप्रमाणे जर आपण नाशिक जिल्ह्यातील कळवण,
सटाणा म्हणजेच बागलाण, देवळा आणि मालेगाव या तालुक्यांचा विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने फळबागांमध्ये डाळिंब हे पीक प्रामुख्याने घेतले जाते व इतर पिकांमध्ये कांदा आणि मक्याचे उत्पादन सर्वाधिक होते. परंतु या सगळ्या पिकांना फाटा देत सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव या गावचे शेतकरी दीपक अहिरे यांनी मात्र चक्क नारळाची लागवड केली व ती यशस्वी देखील करून दाखवलेली आहे.
ब्राह्मणगावच्या शेतकऱ्याने केली कोलंबस नारळाची लागवड
याबाबत सविस्तर वृत्त असे की, डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर असलेल्या या पट्ट्यामध्ये डाळिंब फळबागांची संख्या सध्या कमी झालेली आहे व त्याला प्रमुख कारण ठरले ते डाळिंब पिकावरील मर आणि तेल्या रोग हे होय.
त्यामुळे आता या पट्ट्यातील शेतकरी प्रामुख्याने ड्रॅगन फ्रुट, एप्पल बोर तसेच अंजीर, आंबा व द्राक्ष इत्यादी फळबागांकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. परंतु याही पुढे जात ब्राह्मणगाव येथील शेतकरी दीपक अहिरे यांनी मात्र वडील सिताराम अहिरे यांच्या मार्गदर्शन घेतले व यांचे बंधू रुपेश अहिरे यांची मदत घेऊन नारळाची शेती करायला सुरुवात केली.
इतकेच नाही तर ते आता पुढे कच्ची खजूर लागवड देखील करणार असून हा तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण परिसरातील एक नवीनच प्रयोग असल्यामुळे इतर शेतकऱ्यांसाठी देखील हा प्रयोग फायद्याचा ठरताना दिसून येणार हे मात्र निश्चित.
पाच वर्षांनी सुरू होईल नारळाचे उत्पादन
दीपक अहिरे यांनी चार एकर क्षेत्रात गेल्या वर्षापासून नारळाची झाडांची लागवड केली व या चार एकरात पाचशे नारळाची झाडे त्यांनी लावली आहेत. मध्ये त्यांनी लहान जातीच्या कोलंबस नारळाची लागवड केलेली आहे.
या कोलंबस नारळाचे वैशिष्ट्य म्हणजे याला तीन फुटापासूनच नारळ लागायला सुरुवात होते. एका झाडाला साधारणपणे पाचशे ते सातशे नारळ लागतात. दीपक अहिरे यांनी जेव्हा कोलंबस नारळ लागवडीचा निर्णय घेतला तेव्हा त्याची रोपे थेट आंध्र प्रदेश राज्यातील राजमंडरी येथून आणले
व एका रोपाकरिता त्यांनी तीनशे रुपये मोजले आहेत.रोपे आणल्यानंतर त्यांनी 18 बाय 18 फुटावर या झाडांची लागवड केली व आज त्यांच्या शेतामध्ये नारळाची बाग बहरताना आपल्याला दिसून येत आहे.