Business Success Story:- एखादी नाविन्यपूर्ण कल्पना डोक्यात येणे व ती कल्पना सत्यात उतरवण्यासाठी अतोनात मेहनत करून यशस्वी होणे खूप गरजेचे असते व असे अनेक यशस्वी उद्योजक आपल्याला महाराष्ट्रात दिसून येतात. असे म्हटले जाते की या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही.
तुमच्यामध्ये जर एखादी गोष्ट मिळवायची जबर इच्छाशक्ती असेल व त्यासाठी लागणारे कष्ट उपसण्याची तयारी असेल तर कितीही अवघड गोष्ट असली तरी ती आपल्याला मिळवता येते किंवा ती साध्य करता येते.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण इंदापूर येथील तात्यासाहेब फडतरे व त्यांच्या पत्नी सरोजनी फडतरे यांची यशोगाथा बघितली तर त्यांनी चक्क ज्वारीची पहिली इडली तयार केली होती व तीही 2012 यावर्षी.
आहारातील ज्वारीचे महत्व ओळखून ज्वारीची इडलीच नाहीतर ज्वारीपासून त्यांनी अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करायला सुरुवात केली व आज त्यांचा व्यवसाय कोट्यावधीच्या घरात पोहोचला आहे.
फडतरे दाम्पत्याची यशोगाथा
महाराष्ट्र मध्ये खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु बाजरीच्या तुलनेत जर आपण बघितले तर ज्वारीच्या भाकरींचे प्रमाण खूप कमी असल्याचे दिसून येते.
ज्वारीच्या आहारातील महत्त्व खूप असल्याने आहारामध्ये ज्वारीचे प्रमाण वाढावे याकरिता इंदापूरच्या तात्यासाहेब फडतरे आणि त्यांच्या पत्नी सरोजनी फडतरे यांनी 2012 मध्ये मिलेट्स प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली व पहिली ज्वारीची इडली तयार केली.
तेव्हापासून तर आज म्हणजेच गेल्या 14 वर्षापासून हे दाम्पत्य या प्रक्रिया उद्योगांमध्ये यशस्वीपणे काम करत आहेत ज्वारीच्या पिठापासून अनेक आरोग्यदायी असे प्रक्रिया युक्त पदार्थ तयार करून त्यांनी त्यांचा उद्योग यशस्वी केला आहे.
ज्वारीवर प्रक्रिया करून त्यापासून विविध प्रकारची आरोग्यदायी उत्पादने तयार करायला त्यांनी सुरुवात केली व दैनंदिन आहारातील पदार्थ ज्वारीपासून बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
अशाप्रकारे बनवली पहिली ज्वारीची इडली
दररोजच्या आहारामध्ये जे काही पदार्थ लोक घेतात ते ज्वारीपासून बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यामध्ये त्यांना दिसले की बरेच लोक सकाळी नाष्टा म्हणून इडलीला प्राधान्य देतात व त्यामुळे ज्वारीपासून इडली बनवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला
व याकरिता अगोदर ते हैदराबाद येथील ज्वारी संशोधन केंद्राच्या ठिकाणी गेले व त्या ठिकाणी ज्वारीपासून इडली बनवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केले.पण या इडली मिक्समध्ये तांदळाचे पीठ होते.
पण फडतरे दाम्पत्याला मात्र फक्त ज्वारीच्या पिठापासूनच इडली मिक्स तयार करायचे होते व त्यांनी ते केले. इतकेच नाही तर ते ग्राहकांच्या पसंतीस देखील उतरले. ज्वारीपासून इडली बनवण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता व त्यामुळेच त्यांनी जी काही ज्वारीपासून इडली बनवली ती पहिली ज्वारीची इडली ठरली.
फडतरे यांचा गुड टू इट ब्रँड आहे जगप्रसिद्ध
आपण बघितले की त्यांनी साधारणपणे 2012 या वर्षी मिलेट प्रक्रिया उद्योग उभा केला व आज तो व्यवसाय त्यांचा जगाच्या बऱ्याच भागांमध्ये पोहोचला आहे. त्यांनी गुड टू इट हा ब्रँड विकसित केला व ब्रँड खाली त्यांनी 40 ते 45 प्रक्रिया युक्त उत्पादनांची निर्मिती करून त्याची विक्री करायला सुरुवात केली आहे.
या ब्रँड अंतर्गत ज्वारीपासून इडली मिक्स तसेच ज्वारीचा रवा, ज्वारीचे पोहे तसे ज्वारीचा चिवडा आणि बाजरी व नाचणी इत्यादी धान्यांपासून बनवलेली विविध प्रक्रियायुक्त पदार्थांचा या सगळ्यांमध्ये समावेश आहे.
आज जगाच्या पाठीवरील तब्बल आठ देशांमध्ये ते त्यांची प्रक्रियायुक्त उत्पादने निर्यात करतात व आज त्यांचा व्यवसायाचा टर्नओव्हर अडीच कोटींच्या घरात पोहोचला आहे.