गुंतवणूकदारांसाठी पैसे गुंतवण्याकरिता अनेक योजना सध्या उपलब्ध आहेत व यापैकी बँक आणि पोस्ट ऑफिसच्या ज्या काही योजना आहेत यांना गुंतवणूकदारांकडून विशेष करून पसंती दिली जाते. त्यामधील प्रमुख कारण म्हणजे या दोन्ही पर्यायांमध्ये पैसे गुंतवल्यास गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतात व त्या माध्यमातून मिळणारा परतावा देखील चांगला मिळतो.
त्यामुळे बँकांच्या विविध मुदत ठेवा योजना आणि पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजना आणि मुदत ठेव योजना यामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिले जातात. यात पोस्ट ऑफिसच्या योजनांच्या दृष्टिकोनातून बघितले तर पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सरकारने एक सरकारी बचत योजना सुरू केली असून जी खास महिला व मुलींसाठी आहे.

या योजनेचे नाव आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना होय. 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली होती.
या योजनेच्या माध्यमातून भारतातील कोणतीही महिला किंवा मुलीला पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडून प्रत्येक वर्षाला एक हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत निश्चित व्याज मिळवता येऊ शकते व या खात्यामध्ये 1000 ते 2 लाख रुपये जमा करता येऊ शकतात. या योजनेचा कालावधी दोन वर्षं करीता आहे.
कसे आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचे स्वरूप?
केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही एक अल्पबचत योजना असून ही योजना खास महिला आणि मुलींसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून भारतातील कोणतीही महिला किंवा मुलगी पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकते व प्रत्येक वर्षाला एक हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत निश्चित व्याजाचा फायदा मिळू शकते.
या योजनेच्या खात्यामध्ये एक हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येते. ही योजना दोन वर्षांसाठी असून सरकारकडून एक हजार रुपये ते दोन लाख रुपये पर्यंतचे रक्कम जमा केलेस गुंतवणूक केल्यावर त्यावर 7.5 टक्के चक्रवाढ व्याजाने आकर्षक व्याजाचा फायदा मिळतो. या योजनेबद्दल विशेष लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे ही योजना केवळ दोन वर्षांकरिता असून मार्च 2025 पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
भारत सरकारच्या या योजनेच्या माध्यमातुन पोस्टात खाते उघडून जमा केलेल्या रकमेवर निश्चित 7.5 टक्के व्याजदर मिळतो. या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे महिलांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करणे हा आहे. बऱ्याच महिला बँक खात्यामध्ये पैसे ठेवत नाहीत व त्यामुळे महिला बचत प्रमाणपत्र योजना सुरू करून त्यांना चांगल्या व्याजदराने गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी या योजनेचा फायदा होईल.
या योजनेत खाते उघडण्यासाठी ही पात्रता आवश्यक आहे
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी अर्ज करणारी महिला किंवा मुलगी भारतीय नागरिक असावी.
2- तसेच अर्ज करणाऱ्या महिलेचे वार्षिक उत्पन्न सात लाख रुपयापेक्षा कमी असावे.
3- किशोरवयीन मुली ते ज्येष्ठ नागरिक या वयोगटातील महिला अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकता.
4- सर्व श्रेणीतील महिलांना महिला सन्मान बचत पत्र योजनेत खाते उघडता येते.
या योजनेत खाते उघडण्यासाठी ही कागदपत्रे लागतात
या योजनेत खाते उघडायचे असेल तर महिला अर्जदाराकडे आधार कार्ड, ओळखपत्र म्हणून वोटर आयडी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, मोबाईल नंबर( सक्रिय असावा आणि ओळखपत्रासोबत नोंदणीकृत असावा.), जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र( याकरिता आधार कार्ड किंवा इलेक्ट्रिसिटी बिल ), उत्पन्नाचा दाखला( जर आवश्यक असल्यास), पॅन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो
खाते कसे उघडाल?
या योजनेत खाते उघडण्यासाठी सगळ्यात अगोदर बँक किंवा पोस्ट ऑफिसला भेट द्यावी लागेल व त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडून या योजनेबद्दलची माहिती घ्यावी. या योजनेत खाते उघडण्यासाठी एक फॉर्म मिळतो व तो फॉर्म काळजीपूर्वक भरावा व सांगितलेली सगळी कागदपत्रे जोडावीत.
भरलेला फॉर्म बँकेत जमा करावा. त्यानंतर बँक तुमचे खाते उघडेल व या खात्यात तुम्ही रक्कम जमा करू शकता. जेव्हा या खात्यामध्ये तुम्ही रक्कम जमा कराल तेव्हा त्यामध्ये तुम्हाला पावती देखील मिळते. तुमचे खाते आणि शिल्लक याचे अपडेट ठेवण्यासाठी तुम्हाला पासबुक मिळते.
काही महत्त्वाची माहिती
तुम्ही या योजनेत खाते उघडल्यानंतर एक वर्ष कालावधी झाल्यास तुम्ही तुमच्या सुरुवातीच्या ठेवीचा 40% रक्कम काढू शकता. खात्यातून पैसे काढण्यासाठी काही अपरिहार्य परिस्थिती असणे आवश्यक आहे व अशा परिस्थितीत तुम्हाला 7.5% व्याज दिले जाईल. तुम्हाला जर खाते बंद करायचे असेल तर तुम्ही सहा महिन्यानंतर खाते बंद करू शकता. परंतु काही कारण नसताना जर तुम्ही खाते बंद केले तर व्याजदर साडेसात ऐवजी साडेपाच टक्के असतो.