महाराष्ट्रातील प्रमुख धरणे ‘फुल्ल’ ! शेतकऱ्यांना दिलासा,पाण्याची चिंता जवळपास मिटली

Published on -

Maharashtra Dam Storage : राज्यातील सर्व प्रमुख व मोठी धरणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत भरली आहेत. राज्यातील बहुतांश धरणे ‘फुल्ल’ झाल्याने शेतकऱ्यांची खरिपासोबत रब्बी हंगामाचीही चिंता मिटली आहे. सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने राज्यातील रब्बी हंगामातील पिकांना बहर येईल. मराठवाड्यातील जायकवाडी धरण ९८ टक्के, सोलापूरमधील उजनी धरण १०० टक्के, साताऱ्यातील कोयना धरण ९९ टक्के भरले आहे. गोसीखुर्द ५५ टक्के भरले आहे.

राज्यात यंदा जूनपासूनच चांगला पाऊस पडला. जुलैमध्येही राज्यभर जोरदार पाऊस झाला. तुलनेने ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच राज्यभर पावसाने हजेरी लावली. सध्याही राज्याच्या अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. यंदा ऑगस्ट महिना वगळता जूनपासून सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने राज्यातील सहाही विभागांतील सर्व मोठी धरणे ९३ टक्के भरली आहेत.

पुणे आणि कोकणातील ९७ टक्के धरणे भरली आहेत, तर सर्वात कमी नागपूर विभागातील धरणे ८५ टक्के भरली आहेत. राज्यभरातील मध्यम आकाराची धरणे सरासरी ७० टक्के तर लघु प्रकल्पातील धरणे ५० टक्के इतकी भरली आहेत. पालघर, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग आदी कोकणातील जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने बहुतांश धरणे भरली आहेत. पालघरमधील धामणी व मध्य वैतारणा फुल्ल भरली आहेत. सिंधुदुर्गातील तिल्लारी धरण ९० टक्के भरले आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी ठाणे जिल्ह्यातील भातसा, तानसा, मोडकसागर, बारवी आदी मोठी धरणे ९५ ते १०० टक्के अशी भरली आहेत. त्यामुळे मुंबईकरांचीही वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

नागपूरमधील तोतलाडोह धरण १०० टक्के भरले आहे, तर गोसीखुर्द केवळ ५५ टक्के भरले आहे. अमरावतीतील ऊर्ध्व वर्धा धरण ९५ टक्के भरले आहे. यवतमाळमधील इसापूर धरण ९८ टक्के भरले आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरण ९७ टक्के भरले असले तरी या धरणाच्या खाली असलेले माजलगाव धरण केवळ ३६ टक्के भरले आहे. लातूरमधील मांजरा धरण ७५ टक्के तर निम्न दुधना ७५ टक्के भरले आहे.

हिंगोलीतील येलदरी धरण ७१ टक्के भरले आहे. धाराशिवमधील निम्न तेरणा ७३ तर सिना कोळेगाव ३५ टक्के भरले आहे. नाशिक, नगरमधील सर्व धरणे फुल्ल झाल्याने आणि अजूनही महिनाभर पाऊस पडणार असल्याने ऑक्टोबरमध्ये मराठवाड्यातील उर्वरित धरणे भरतील, अशी माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. यंदा सर्वत्र चांगला पाऊस पडल्याने खरिपातील पिके जोमदार आहेत. आता धरणे भरल्याने रब्बी हंगामातील पिके शेतकरी घेतील आणि राज्याला याचा फायदा होईल, असेही हा अधिकारी म्हणाला.

नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण १०० टक्के, मुळा ९५ टक्के, निळवंडे धरण १०० टक्के भरली आहेत. उत्तर महाराष्ट्रातील जळगावमधील उर्ध्व तापी हतनूर (४५ टक्के) वगळता नाशिकसह सर्व धरणे ९० ते १०० टक्के भरली आहेत. कोल्हापुरातील दूधगंगा, राधानगरी, तिल्लारी (धामणे) आणि तुळशी ही चारही धरणे पूर्ण भरली आहेत. पुणे जिल्ह्यातील माणिकडोह (७२ टक्के) वगळता नारा देवधर, डिंभे, भाटघर, पानशेत, वरसगाव, मुळशी टाटा ही धरणे १०० टक्के भरली आहेत. सांगलीतील वारणा धरण ९८ टक्के, तर साताऱ्यातील वीर धरण १०० टक्के भरले आहे. कोल्हापूरप्रमाणे सांगली, सातारा, पुण्यातील बहुतांश धरणे ९५ ते १०० टक्के भरली आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पाण्याची चिंता जवळपास मिटली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe