व्यक्तीमध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असेल व ठरवलेले ध्येय पूर्ण करण्याची क्षमता व त्यासाठी करावे लागणाऱ्या प्रयत्नांमध्ये सातत्य असेल तर ध्येय गाठण्यापासून व्यक्तीला त्याचे वय किंवा असलेल्या शारीरिक मर्यादा देखील थांबवू शकत नाहीत. ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्य, कष्ट करण्याची तयारी,
कुठलीही परिस्थिती आली तरी दोन हात करत त्या परिस्थितीशी झगडत काढलेला मार्ग आणि जोपर्यंत ध्येय मिळत नाही तोपर्यंत न थांबता केलेले प्रयत्न हे गुण त्याकरिता खूप महत्त्वाचे असतात. त्या व्यक्तीमध्ये हे गुण असतात ते व्यक्ती कुठल्या क्षेत्रामध्ये यशस्वी ठरते.

अगदी याच मुद्द्याला धरून सातारा जिल्ह्यातील नागठाणे या गावचे मनोहर साळुंखे या शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर हा मुद्दा आपल्याला अधिक ठळकपणे समजून घेता येईल.
कारण मनोहर साळुंखे हे दिव्यांग आहेत. परंतु या दिव्यांगावर मात करत या आपल्या शारीरिक मर्यादेचा कुठलाही प्रकारे बाऊ न करता शेती क्षेत्रामध्ये उतरून अवघ्या अर्धा एकर शेतीतून सुरुवात करून आज 17 एकर जमिनीचा मालक होण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्यांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
दिव्यांगावर मात करत शेतीत केली प्रगती
सातारा जिल्ह्यातील नागोठाण या गावचे मनोहर साळुंखे शरीराने दिव्यांग आहेत. परंतु तरी देखील त्यांनी शेतीमध्ये वाखाणण्याजोगी प्रगती केलेली आहे. साधारणपणे 40 वर्षापासून ते शेती क्षेत्रामध्ये आहेत. जर त्यांचे बालपण पाहिले तर ते शिक्षण घेत असताना देखील आई-वडिलांना शेतीमध्ये मदत करायचे अशा परिस्थितीत त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
परंतु त्यांच्या आई-वडिल ज्या पद्धतीने शेती करायचे ती पारंपारिक पद्धत होती व त्यामध्ये कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्य आणि घरी असलेल्या जनावरांना चाऱ्याची सोय होईल एवढ्या पद्धतीने त्यांची शेती होती. यापलीकडे त्यांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक फायदा मात्र होत नव्हता.
मग कालांतराने साळुंखे यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला व तशी इच्छा आई-वडिलांजवळ बोलून दाखवली. परंतु वडिलांची अशी इच्छा होती की त्यांनी शेती न करता शिक्षण घ्यावे. तसेच दिव्यांगामुळे त्यांना शेती करता येणे शक्य होईल की नाही असे देखील प्रश्न त्यांच्यापुढे होते व त्यामुळे घरच्यांचा विरोध झाला.
परंतु मनोहर साळुंखे यांनी नोकरी करणारच नाही आणि शेतीच करणार असे ठासून सांगितले व वडिलांच्या मागे हट्टाने पेटून त्यांच्याकडून अर्धा एकर शेती स्वतः करण्यासाठी घेतली.
अर्धा एकरमध्ये मी ज्या पद्धतीने पीक घेईल व त्यामधून जर फायदा झाला तर आपण पूर्ण शेती त्या पद्धतीनेच करू असं त्यांनी घरी सांगितले व शेतीला सुरुवात केली.
अशा पद्धतीने अर्ध्या एकर पासून झाली शेतीला सुरुवात
घरच्यांकडून अर्धा एकर शेती करण्यासाठी घेतली व त्यामध्ये पालेभाज्यांची लागवड सुरू केली. या छोट्याशा क्षेत्रामध्ये त्यांनी कोथिंबीर तसेच मेथी व तांदळाचे उत्पादन घेतले व साताऱ्याला विक्रीसाठी नेऊन त्या माध्यमातून चांगले पैसे मिळू लागले.
कालांतराने त्या शेतामध्ये कोबीचे उत्पन्न घेतले व त्यामध्ये देखील त्यांना चांगले पैसे मिळाले व यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. या सगळ्यामुळे घरच्यांचा देखील त्यांच्यावर विश्वास बसला व त्यांच्या पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला. त्यानंतर मनोहर साळुंखे यांनी द्राक्षाची बाग बाकी शेतीमध्ये घेतली व यामध्ये मात्र त्यांना हवा तेवढा नफा झाला नाही.
परंतु निराश न होता त्यांनी अनेक प्रयोग शेतीमध्ये सुरू केले. परंतु या प्रक्रियेमध्ये त्यांच्यावर कर्जाचा बोजा देखील वाढला. परंतु न डगमगता त्यांनी पुढच्या वर्षी द्राक्षातून चांगले उत्पन्न घेतले व कर्ज फेडले.
परंतु द्राक्षाचे उत्पादन घेत असताना त्यांच्या लक्षात आले की द्राक्षबाग किंवा फळबाग एकदाच वर्षातून आपल्याला पैसे देते. त्यामुळे दररोज आपल्याला पैसे मिळणारे पीक घ्यायला हवे हे त्यांनी ठरवले व भाजीपाला शेतीला सुरुवात केली.
त्यासोबतच शेतीमध्ये तैवान पिंक या पेरूच्या जातीची लागवड केली व पेरूचे दर्जेदार उत्पादन घेतले व देश विदेशातून त्यांच्या या पेरूला मागणी मिळाली व त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढले.
शेतकऱ्यांना एकत्र घेऊन केली 25 एकरमध्ये टोमॅटो लागवड
त्यानंतर इतर शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी 25 एकरमध्ये टोमॅटोची लागवड करून देखील चांगला फायदा मिळवला.टोमॅटो लागवड त्यांना खूप फायद्याची ठरली व या टोमॅटोतून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी जमीन खरेदी तसेच शेताला लागणारे अवजारे व ट्रॅक्टर इत्यादी खरेदी केले.
पद्धतीने शेती करायला सुरुवात केल्याने त्यांचा नफा वाढत गेला व आज त्यांच्याकडे एकूण 17 एकर जमीन आहे. 25 शेतकऱ्यांना एकत्र करून 25 एकर क्षेत्रामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करून त्यांना खूप चांगला फायदा झाला.
अशा पद्धतीमध्ये सर्व शेतकऱ्यांची एकमेकांना मदत झाली व एकत्रित काम केले व खर्च देखील कमी होऊन या 25 एकरमधील टोमॅटोतून प्रत्येक शेतकऱ्याला देखील लाखो रुपयांचा फायदा झाला.
अशाप्रकारे दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यामुळे मनोहर साळुंखे यांनी शेतीमध्ये मोठी प्रगती केली व शेतकऱ्यांना एकत्र करून टोमॅटो लागवडीचा प्रयोग करून त्यांच्यासोबत इतर शेतकऱ्यांना देखील लाखो रुपये मिळवून दिले.