Ahmednagar Politics : तारीख होती डिसेंबर 2022. नगर दक्षिणेतील राष्ट्रीय महामार्गासाठी निलेश लंके यांचं चार दिवस उपोषण. त्यावेळी दक्षिणेचे खासदार होते सुजय विखे. त्यानंतर गेल्या महिन्यात दूध दरासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवस उपोषण. त्या खात्याचे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे. आत्ताही गेल्या चार दिवसांपासून निलेश लंके हे स्थानिक गुन्हे शाखेच्या तक्रारीसाठी पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत. आत्ताही पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे… उपोषण हे फक्त विखेंना टार्गेट करण्यासाठी असतंय का..? लंकेंच्या उपोषणानंतर विखे टार्गेट होणं, हा फक्त योगायोग असतो का..? दक्षिणेनंतर आता उत्तरेत फोकसला येण्यासाठीच हा सगळा खटाटोप सुरु आहे का.. ? याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न…
नगर दक्षिणेची लोकसभा निवडणूक, यंदा न भूतो न भविष्यती गाजली. विखेंसारख्या दिग्गजांचा पराभव करुन निलेश लंकेसारखा तळमळीचा कार्यकर्ता खासदार झाला. प्रस्तापितांविरोधात नवखा अशी लढत झाली. ही लढत लोकांनीच हाती घेतल्याचं बोललं गेलं. त्याच कारणही तसंच होतं. आयुष्यात कधीही पराभव न पाहिलेल्या विखे कुटुंबातल्या सदस्याला या निवडणुकीत पराभूत व्हाव लागलं. लंके जिंकले. लढाई थांबली. पण अजूनही विखे- लंके यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाही. निकालाला दीड महिना उलटत नाही तोच, ही निवडणूक कोर्टात गेली. विखेंनी लंकेंची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे विखे पराभवच मान्य करत नाही, असा आरोप लंकेंनी केला. आता विखे-लंके वादाचा दुसरा भाग सुरु झालाय. निवडणुकीपूर्वीचा पहिल्या भागातील वाद हा फक्त आरोप-प्रत्यारोपांचा होता. मात्र आता दुसरा भाग हा एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठीच सुरु आहे का, हा प्रश्न पडतो.
खासदारकी मिळाल्यानंतर लंकेंनी पहिल्या दिवसापासून काम सुरु केलं. विशेष म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचं काम सुरु केलंय, हे दाखविण्यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात उपोषण केलं. ते सोडविण्यासाठी नाईलाजाने स्वतः राधाकृष्ण विखेंना यावं लागलं. महसूलमंत्री तथा पालकमंत्री असलेल्या विखेंच्या विरोधात लंकेंनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केलीय. विखेंची प्रशासनावर असलेली पकड सैल करण्यासाठीच हे सगळं सुरु आहे की काय, हा प्रश्न यानिमित्त पुढे येतोय. पालकमंत्री हा जिल्ह्यातील प्रशासनाचा बाँस असतो. म्हणजेत विखे हे सध्या जिल्हा प्रशासनाचे बाँस आहेत. आणि लंके प्रशासनातील वेगवेगळ्या विभागातच लोकभावनेच्या माध्यमातून हात घालत आहेत. लंकेंनी महिनाभरात सलग दोन प्रश्नांसाठी उपोषणाचं हत्यार उपसलं. त्यामुळेच फक्त विखेंना टार्गेट करण्यासाठीच लंकेंचा हा खटाटोप सुरु आहे, असा आरोप विखेंच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय.
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाला हजेरी लावत महाराष्ट्रातील अनेक खासदार, आपल्या मतदारसंघातील प्रश्न संसदेत मांडताना दिसताहेत. लंके मात्र एका पोलिस निरीक्षकाच्या बदलीसाठी आग्रही राहत, उपोषण करताना दिसताहेत. भ्रष्ट्राचार- गैरव्यवहाराविरोधात लंके संविधानीक मार्गाने लढताहेत, हे निश्चित गौरवास्पद आहे. मात्र संसदीय अधिवेशनात हजेरी लावून आपल्या मतदारसंघाची प्रश्न सोडवणंही तितकच महत्त्वाचं आहे. आंदोलन कधीही करता येऊ शकतं, मात्र अधिवेशनात मांडून प्रश्न सोडण्याची संधी, कायम मिळत नसते. हेच लंके विसरले की काय, असा सवाल लंकेंच्या विरोधकांनी केलाय.
लंकेंच्या दोन्ही उपोषणाला महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी स्टेजवर हजेरी लावली. येत्या दोन-तीन महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे फक्त महाविकास आघाडीची हवा करण्यासाठीच हे उपोषण सुरु असल्याचा आरोप, महायुतीकडून केला जातोय. तर नगर जिल्ह्याला एवढा अँक्टीव्ह खासदार यापूर्वी कधीच मिळाला नव्हता, असा सूर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांतून लावला जातोय. सत्तेच्या पहिल्या दिवसांपासून सर्वसामान्यांसाठी काम, हा लंकेंचा स्वभावगुण या आंदोलनांतून नक्कीच दिसला. लंकेंच्या आंदोलनानंतर पालकमंत्री म्हणून विखेच टार्गेट होणं, हा योगायोग असेलही. पण विखेंनी कोर्टात नेलेली निवडणूक आणि लंकेंचे एकामागून एक सुरु असलेली आंदोलन, यामुळे विखे-लंके हा वाद भविष्यात आणखी चिघळणार का, हा प्रश्न मात्र यानिमित्ताने पुढे येत आहे.