Mumbai New Expressway : एकीकडे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे तर दुसरीकडे राजधानी मुंबईला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होणाऱ्या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा सर्वसामान्यांसाठी खूप ला करण्यात आला असून आता बाकी राहिलेला इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा एप्रिल अखेरीस सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.
अशातच देशातील सर्वांत मोठ्या महामार्ग प्रकल्पांपैकी एक असलेल्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून एक मोठे अपडेट समोर येत आहेत. खरे तर दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे 1386 किलोमीटर लांबीचा असून यापैकी 1156 किलोमीटर लांबीचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यापैकी 756 किलोमीटर लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

खरे तर या महामार्ग प्रकल्पाचे 1136 किलोमीटर लांबीचे काम जुलै 2024 पर्यंतच पूर्ण झाले होते मात्र त्यानंतर या महामार्ग प्रकल्पाच्या कामात फारशी प्रगती झालेली दिसत नाही. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान कंत्राटदारांचा संथ वेग, निसर्गनिर्मित अडचणी आणि भूसंपादनातील विलंब यामुळे काही समस्या आल्या आहेत अन म्हणूनच या प्रकल्पाचे काम जलद गतीने होत नसल्याचा दावा सरकारकडून होतोय.
विशेषतः सूरत ते गुजरात-महाराष्ट्र सीमेपर्यंतच्या 140 किमी लांबीच्या पाच पॅकेजेसमधील कामाला अधिक उशीर होत आहे, ज्यामुळे अंतिम मुदत आणखी पुढे ढकलली गेली आहे. दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारतातील सर्वांत लांब महामार्ग असेल.
हा महामार्ग हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रामधील प्रमुख शहरे राष्ट्रीय राजधानी दिल्लीशी जोडतो. या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते दिल्ली दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. सध्या दिल्ली आणि मुंबई यांना NH-48 जोडतो, जो 1440 किमी लांब आणि प्रचंड वर्दळीचा आहे.
मात्र, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यावर प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई ते दिल्ली दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 24 तासांचा वेळ लागतो मात्र हा महामार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास कालावधी 12 तासांवर येणार आहे.
हा महामार्ग 8 लेनचा असून भविष्यात 12 लेनपर्यंत विस्तारता येणार आहे. या महामार्गावरून 120 किलोमीटर प्रतितास या वेगाने गाड्या चालवता येणे शक्य होईल. हा सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा प्रकल्प असून, देशातील वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवण्याची क्षमता यामध्ये आहे.
सरकारने उरलेल्या कामासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या असून, अंतिम खर्च फक्त उर्वरित भागाच्या पूर्णतेनंतरच ठरवता येईल, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले. दिल्ली-मुंबई महामार्गामुळे प्रवास जलद आणि सोयीस्कर होणार असून वाहतूक कोंडीस मोठा दिलासा मिळणार आहे. हा महामार्ग भारताच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे. नक्कीच हा महामार्ग प्रकल्प आपल्या महाराष्ट्रासाठी देखील मोठा उपयोगी ठरणार आहे.