Navratri Special 2024: महाराष्ट्रातील ‘या’ गावातील मंदिरात आहेत देवीची साडेतीन शक्तीपीठे! नवरात्रीत एकाच ठिकाणी घेता येईल साडेतीन शक्तीपीठाचे दर्शन

नवरात्रीमध्ये तुम्हाला साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घ्यायचे असेल तर ते तुम्ही एकाच मंदिरात घेऊ शकतात.बीड जिल्ह्यात असलेल्या लिंबागणेश गावामध्ये हे मंदिर असून या एकाच मंदिरात देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत.

Published on -

Navratri Special 2024:- नवरात्र उत्सव सगळीकडे मोठ्या धामधूमीत आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जात असून महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध ठिकाणी असलेल्या देवीच्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी दिसून येत आहे.

खास करून तुळजापूरची तुळजाभवानी तसेच कोल्हापूरची अंबाबाई, माहूरगडची रेणुका देवी आणि वनी गडाची सप्तशृंगी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी आपल्याला या कालावधीत दिसून येते.

आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र मध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी तसेच माहूरची रेणुका देवी आणि वणीची सप्तशृंगी देवी मिळून साडेतीन शक्तीपीठे आहेत. परंतु या नवरात्रीमध्ये तुम्हाला साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घ्यायचे असेल तर ते तुम्ही एकाच मंदिरात घेऊ शकतात.

बीड जिल्ह्यात असलेल्या लिंबागणेश गावामध्ये हे मंदिर असून या एकाच मंदिरात देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. याच मंदिराची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 एकच मंदिरात घेता येईल देवीचे साडेतीन शक्तीपीठाचे दर्शन

लिंबागणेश गावामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी तसेच माहूरची रेणुका देवी आणि वणीची सप्तशृंगी अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे एकच मंदिरात असून दर्शनासाठी विविध ठिकाणाहून या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. या मंदिराचे सगळे व्यवस्थापन हे मोरे कुटुंबाच्या माध्यमातून केले जाते.

1982 मध्ये लिंबागणेश गावातील विठ्ठलराव मारुती मोरे व पद्मिनी बाई मोरे या दांपत्याने या मंदिराचा जिर्णोद्धार करत 350 चौरस फुटाच्या सातखणी माळवदात महालक्ष्मी तसेच तुळजाभवानी, रेणुका देवी आणि सप्तशृंगी ही साडेतीन शक्तीपीठे स्थापित केली. इतकेच नाही तर या मंदिरामध्ये खंडोबा, म्हाळसाई तसेच येडेश्वरी, महादेव या पंचायतन देवता देखील आहेत.

सध्या या मंदिराचे सगळी देखभाल मोरे कुटुंबातील जीवनराव मोरे व वेणूताई मोरे यांच्या माध्यमातून केली जात आहे. या मंदिरामध्ये देवीच्या साडेतीन शक्तीपीठांना नवीन वस्त्र परिधान करून अलंकाराने सजवले जाते.कोजागिरी पौर्णिमेपर्यंत गावातील डवरी, गोसावी व गोंधळी समाजाकडे आरतीचा मान आहे.

नवरात्र उत्सव कालावधीमध्ये या ठिकाणी दर्शनाला बीड जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. या ठिकाणाच्या मंदिरात नवरात्रीच्या घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भक्ती आराधना मोठ्या प्रमाणावर असते. देवीच्या विविध क्षेत्रांची या ठिकाणी पूजा केली जाते व गावातील महिला मंडळी देवी मंदिरात भजन करतात.

यासोबतच अष्टमीला महाभिषेक व दुर्गा सप्तशतीचे यज्ञ, होम हवन करून आरती केली जाते. नवमीला कुमारिका पूजन तसेच मसाले भाताचा गोड पदार्थांचा देवीला नैवेद्य चढवला जातो. विशेष म्हणजे हा नैवेद्य गावातील प्रत्येक घरात तयार केला जातो व  देवीला अर्पण करतात.

 या ठिकाणी अवतरली आहे गणपती बाप्पांची मूर्ती

या मंदिरात पूर्वीपासून देवाची मूर्ती होती व त्याची दररोज पूजा अर्चना केली जात होती व शेंदुर लेपामुळे तो नेमका कोणता देव आहे हे कोणालाच माहिती नव्हते.

या ठिकाणी मूर्तीला विविध अलंकार घालून महापूजा देखील केली जात होती. परंतु एका ऋषीपंचमीच्या दिवशी त्या मूर्तीवरील शेंद्राची खोळ स्वतःहून गळून पडली व त्यातून गणपती मूर्ती प्रकट झाल्याचे सांगण्यात येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe