मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी आता घरी बसून करता येईल अर्ज! नवीन ॲप सुरू, रांगेत उभे राहण्याची झंझटमारी संपणार

नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला व यामध्ये राज्यातील महिला वर्गांसाठी महत्त्वाची असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे व या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. त्यामुळे या योजने करिता अर्ज करण्यासाठी एक जुलैपासून सुरुवात झाली असून त्याची शेवटची मुदत 15 जुलै होती

व आता ती वाढवून 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांच्या जमवाजमवीमध्ये महिला वर्गांची प्रचंड प्रमाणात गर्दी तहसील कार्यालयांमध्ये दिसून येत होती

व तसेच सेतू केंद्रांमध्ये देखील गर्दी दिसून येत आहे. तसेच यामध्ये अनेक प्रकारची आर्थिक लूट देखील होण्याची शक्यता असल्यामुळे  आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज करताना कुठल्याही प्रकारची समस्या येऊ नये म्हणून एक ॲप विकसित करण्यात आलं असून या ॲपच्या मदतीने महिलांना घरी बसून अर्ज करता येणार आहे.

 या ॲपच्या मदतीने करता येणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना अर्ज करता यावा याकरिता आता नारीशक्ती दूत नावाचे ॲप सुरू करण्यात आले असून त्यामुळे महिलांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. तसे पाहायला गेले तर जेव्हा ही योजना लागू करण्यात आली तेव्हाच हे ॲप सुरू करण्यात आलेले होते. परंतु काही टेक्निकल समस्यांमुळे ते बंद ठेवण्यात आले होते.

परंतु यामध्ये ज्या काही तांत्रिक समस्या आल्या होत्या त्या आता दूर करण्यात आल्या असून त्यामुळे आता महिलांना या ॲपच्या मदतीने या योजनेकरिता घरबसल्या अर्ज करता येणार आहे. यामध्ये उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचा कॉलम देखील सुरू करण्यात आला असून येत्या दोन दिवसात हे ॲप अपडेट होणार आहे.

 कसा कराल या ॲपचा वापर?

नारीशक्ती दूत हे ॲप google च्या प्ले स्टोअर वर उपलब्ध असून यामध्ये सुरुवातीला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करावे लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या प्रोफाईलमध्ये स्वतःची माहिती भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल

व तुम्ही यामध्ये कुठल्या गटात बसता याचा देखील पर्याय निवडायचा आहे. या पर्यायांमध्ये बचत गटाचे सदस्य, गृहिणी आणि इतर असे पर्याय आहेत. त्यावर इतर गोष्टी व्यवस्थितरित्या भरल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेकरिता केलेला अर्ज यशस्वीपणे सादर करता येणार आहे.