Elevated Way:- महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी पुणे व छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर या राज्यातील महत्त्वाच्या शहरांना जोडणारा जो काही चौपदरी महामार्ग आहे त्या महामार्गाचे आता विस्तारीकरण होणार असून या महामार्गावर दररोज मराठवाडा आणि विदर्भातून 24000 वाहने पुण्याला ये जा करत असतात.
परंतु या मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होते व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पुण्यामधील या मार्गावर असलेले शिरूर आणि खराडी दरम्यानची वाहतूक कोंडी बघितली तर यामध्ये प्रवास करणाऱ्यांचा वाहतूक कोंडीमुळे 90 मिनिटांचा वेळ दररोज वाया जात असतो.
त्यामुळे या वाहतूक कोंडीतून प्रवाशांना दिलासा मिळावा याकरिता आता छत्रपती संभाजीनगर- अहमदनगर ते पुणे या जुन्या चौपदरी महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे व विस्तारीकरणाच्या माध्यमातून शिरूर ते खराडी या 53 किलोमीटर अंतरावर सहा पदरी उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
शिरूर ते खराडी दरम्यान होणार 53 किमीचा उन्नत मार्ग
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजीनगर- अहमदनगर ते पुणे या जुन्या चौपदरी महामार्गाचे आता विस्तारीकरण होणार असून त्याकरिता नऊ हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या महामार्गावर दररोज मराठवाडा आणि विदर्भातून 24 हजार वाहने पुण्याला ये जा करत असतात.
परंतु जर आपण पुण्यातील शिरूर ते खराडी दरम्यानची वाहतूक कोंडी बघितली तर दररोज सरासरी 90 मिनिटांचा वेळ वाया जातो. त्यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी याकरिता या विस्तारीकरणातूनच आता शिरूर ते खराडी दरम्यान 53 किमीचा सहा पदरी उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले असून खराडी ते लोणीकंद व लोणीकंद ते शिक्रापूर व शिक्रापूर ते शिरूर असा हा उन्नत मार्ग असणार आहे.
छत्रपती संभाजीनगर- अहमदनगर आणि पुणे या महामार्गाची सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. सध्या जर हा महामार्ग पाहिला तर तो चार लेनचा असून यावर अहमदनगर शहरातील कोठला, पुणे जिल्ह्यातील शिरूर तसेच शिक्रापूर, लोणीकंद व खराडी येथे वाहतूक कोंडी होते व त्यावर उपाय म्हणून हा उन्नत मार्गाचा पर्याय आता निवडण्यात आलेला आहे.
इतकेच नाहीतर या विस्तारीकरणांमध्ये आता संभाजीनगर जवळ ज्या ठिकाणी दोन रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी एक उड्डाणपूल उभारण्यासाठी डीपीआर तयार केला जाईल व पंढरपूर ते वाळूजच्या परिसरात उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.
उन्नत मार्ग म्हणजे काय व त्याचा वापर कसा होतो?
जर आपण ईलीव्हेटेड वे म्हणजेच उन्नत मार्ग पाहिला तर तो जमिनीपासून काही उंचीवर खांबांच्या आधारे बांधलेला मार्ग असतो. उड्डाणपुलाप्रमाणेच या उंच रस्त्याचा वापर रहदारीचे जे काही स्तर असतात ते वेगळे करण्यासाठी केला जातो. परंतु ते शहरी भागाच्या वर प्रवास करणारे प्रमुख मार्ग म्हणूनही काम करू शकतात व त्यांची रचना सामान्यप्रमाणे उड्डाणपणापेक्षा लांब असते.