माहिती कायद्याची! अपत्य नसलेल्या महिलेला तिच्या वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीचे तिच्या पश्चात काय होते? काय म्हणतो कायदा? वाचा माहिती

भारतामध्ये संपत्तीच्या बाबतीत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कायदे असून त्या कायद्यानुसारच संपत्तीचे विनिमय किंवा इतर गोष्टी पार पाडल्या जातात. संपत्ती वाटपाच्या बाबतीत अनेकदा विविध गोष्टींना धरून वाद उद्भवतात व या बाबत असलेल्या कायद्यांचा आधार घेऊन हे वाद  कोर्टाच्या माध्यमातून मिटवले जातात.

जर आपण यामध्ये असलेल्या कायद्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 हा देखील याबाबतीत एक महत्त्वाचा कायदा असून संपत्तीचे वारसांकडे हस्तांतरणाच्या बाबतीत हा कायदा खूप महत्वपूर्ण आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिले तर एखाद्या अपत्य नसलेल्या महिलेचा मृत्यू झाला तर तिला तिच्या वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीचे काय होते याबद्दल माहिती मिळू शकते.

 अपत्य नसलेल्या महिलेचे तिच्या पश्चात  वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीचे काय होते?

एखाद्या अपत्य नसलेल्या महिलेचा मृत्यू झाला व तिला जर तिच्या वडिलांकडून संपत्ती मिळालेली असेल तर ती संपत्ती पुन्हा तिच्या वारसांकडे हस्तांतरित केली जाईल असा एक महत्वपूर्ण निर्णय नुकताच मागील काही दिवसांपूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता व हा निर्णय हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 च्या कलम 15(2) नुसार देण्यात आला आहे.

जर आपण हा कायदा पाहिला तर यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, समजा एखाद्या हिंदू महिलेचा मृत्यू झाला व तिने मृत्युपत्र केलेले नसेल तर तिला ज्या कुटुंबाकडून मालमत्ता मिळालेली असते ती पुन्हा त्या कुटुंबाच्या वारसांना हस्तांतरित केली जाईल. समजा ही मालमत्ता पती किंवा सासरच्या व्यक्तींकडून वारसा हक्काने मिळाली असेल तर ती पतीच्या वारसांकडे हस्तांतरित होईल.

त्यासोबतच अपत्य  नसलेल्या कुटुंबियांनी त्यांच्या मृत्यूनंतर मालमत्ता कोणाकडे दिली पाहिजे याचे सगळे नियोजन ते हयात असतानाच करणे गरजेचे आहे. याकरिता अशा कुटुंबांनी एखादा विश्वसनीय व्यक्ती उत्तर अधिकारी आणि विश्वस्त म्हणून निवडणे गरजेचे आहे.

 एखाद्या विवाहित हिंदू महिलेचा मृत्यू झाला मृत्युपत्र केले नसेल तर

दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार बघितले तर एखाद्या विवाहित हिंदू महिलेचा मृत्यू झाला असेल व तिने जर मृत्युपत्र केलेले नसेल तर त्याच्यानंतर त्या महिलेचे मालमत्ता ही सर्वात आधी मुले

मुली आणि तिचा नवरा यांना प्राधान्याने  मिळते. यांपैकी जर कोणीच नसतील तर मग पतीच्या कुटुंबियांकडे आणि तेही नसतील तर आई वडिलांना ती मालमत्ता मिळत असते. ते ही नसतील तर मग सदर मालमत्ता ही आई-वडिलांच्या वारसदारांकडे जाण्याची शक्यता असते.

 एखाद्या जोडप्याला मूलबाळ नसेल तर

समजा एखाद्या दांपत्याला जर अपत्य नाही व अशा दाम्पत्यांनी संपत्तीचे नियोजन करण्यासाठी मालमत्तेच्या वाटपाकरिता दोघांनीही स्वतंत्र वैयक्तिक इच्छापत्र करणे गरजेचे आहे.  मालमत्ता कोणाला द्यायची आहे, मग ती तुमच्या कुटुंबातील सदस्य असो, मित्र असो किंवा सेवाभावी संस्था असो त्याबाबत स्पष्टता असणे गरजेचे आहे.

अशा प्रकरणांमध्ये जर पत्नी किंवा पतीचा अगोदर मृत्यू झाला तर हयात असलेल्या दुसऱ्या पार्टनरने संयुक्त मालकीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन कसे करावे हे देखील इच्छा पत्रात स्पष्ट केले पाहिजे. तसेच तुम्ही परस्पर संमतीने एकच इच्छा पत्र देखील बनवू शकतात. त्यामध्ये स्वतंत्र इच्छापत्र असेल तर दोन्ही भागीदारांच्या इच्छेनुसार  संपत्तीचे वाटप करता येते.