तुमच्याही शेतामध्ये अमरवेल या तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे का? करा या उपाययोजना, अमरवेल तणाचा होईल नायनाट

Ajay Patil
Published:
amarvel

कुठल्याही हंगामामध्ये शेतकऱ्यांनी पिकांची लागवड करण्याअगोदर आणि लागवडीनंतर शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गवत म्हणजेच तण उगवते व त्यामुळे या तणाचा बंदोबस्त करण्यासाठी निंदनी करावी लागते व यामुळे मोठ्या प्रमाणावर मजुरी लागते व त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो. एवढेच नाही तर या तणांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पिकांवर देखील विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येऊ शकते.

तसं पाहायला गेले तर तणांचे खूप प्रकार आहेत व त्यांची वैशिष्ट्ये देखील वेगवेगळी आहेत.परंतु यामध्ये जर आपण हरळी आणि अमरवेल यासारखी तणे पाहिली तर ही नियंत्रण करण्यासाठी देखील अवघड असतात. यामध्ये जर आपण अमरवेल किंवा त्यालाच आपण अधरवेल असे देखील म्हणतो या परोपजीवी तनाचा विचार केला तर हे बाल्या अवस्थेमध्ये जेव्हा असते तेव्हा त्याचा वेल गुंडाळी करून दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावर चिकटतो

व जमिनीपासून नंतर वेगळा होतो व त्यानंतर त्याला सूक्ष्मदातांसारखे जे काही तंतू असतात त्यांच्या मदतीने पिकांमधील अन्न रस शोषतो.त्यामुळे पिकांची वाढ खुंटते व उत्पादनात घट येते. या लेखात आपण अमरवेल या तणाच्या बंदोबस्तासाठी करण्यात येणारे उपाय बघणार आहोत.

 अमरवेल या तणाची सर्वसाधारण माहिती

अमरवेलचे बी शेतामध्ये वीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी करिता सुप्त अवस्थेमध्ये जिवंत राहते. बीजोत्पादन अवस्था येण्यापूर्वीच त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. याचा वेल हा मूळरहीत असतो व पिवळसर,नारंगी रंगाचा वेल असतो व त्याला पानेदेखील नसतात व तो दोऱ्यासारखा दिसतो.

एक अमरवेल प्रत्येक दिवसाला सात सेंटीमीटर पर्यंत वाढून जवळपास 30 चौरस मीटरचे क्षेत्र व्यापतो व 60 दिवसापासून अमरवेलला बी लागण्याची क्रिया सुरू होते. या तनाचा प्रादुर्भाव वाढला तर शंभर टक्के पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते.

 अमरवेल तणाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय

1- सगळ्यात अगोदर तुम्ही पेरणी करिता जे काही बियाणे वापरतात ते प्रमाणित असावे किंवा तण वीरहीत असावे.

2- शेतात शेणखत जर वापरत असाल तर ते पूर्ण कुजलेले वापरावे.

3- तसेच शेताच्या बांधावरील किंवा रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतावर अमरवेलचे तण असेल तर ते काढून टाकून त्याला गाडून अथवा जाळून टाकावे. कारण अमरवेलला तुम्ही झाडापासून वेगळे देखील केले तरी तो अनेक आठवडे जिवंत राहतो.

4- तसेच अमरवेल असलेल्या शेतामध्ये जी काही अवजारे वापरतात ती स्वच्छ करूनच त्यांचा पुन्हा शेतामध्ये वापर करावा.

 अमरवेलच्या नियंत्रणासाठी महत्त्वाच्या काही पद्धती

मशागतीय पद्धत

1- जमिनीची पूर्व मशागत करताना अगोदर जमिनीची खोल नागरणी करून घ्यावी. कारण अमरवेलच्या बियांची अंकुराची जी काही लांबी आहे ती खूप कमी असल्यामुळे 8 cm पलीकडे अमरवेलची उगवण होतच नाही. त्यामुळे खोल नागरणी करणे गरजेचे आहे.

2- निमितपणे डवरणी व निंदनी करून पिकांना तण विरहित ठेवणे गरजेचे आहे.

3- तसेच पिकांची फेरपालट करावी व अमरवेल चा प्रादुर्भाव ज्या शेतामध्ये असेल त्या ठिकाणी तृणवर्गीय पिकांची लागवड करावी.

4- अमरवेल हा परोपजीवी असल्यामुळे त्याला यजमान झाड मिळाले नाही तर त्याशिवाय तो आठ ते दहा दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहत नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या पिकांची लागवड करायची आहे त्या पिकांची लागवड तननियंत्रण पद्धतीचा अवलंब केल्यानंतर साधारणपणे आठ ते दहा दिवसांनी करावी.

 अशा पद्धतीने करा रासायनिक व्यवस्थापन

शेतामध्ये जर तुम्ही सोयाबीन, कपाशी तसेच भुईमूग, तूर, कांदा आणि मिरची या पिकांची लागवड करत असाल तर या पिकांमध्ये उगवणपूर्व तननाशक पेंन्डीमिथॅलिन(38.7 टक्के सी.एस.), तीस ते पस्तीस मिली प्रति दहा लिटर पाणी( एकरी सातशे मिली प्रति 200 लिटर पाणी) याप्रमाणे पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फवारणी करावी. त्यामुळे देखील खूप मोठा फायदा मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe