Real Estate:- जेव्हा आपण कुठल्याही प्रॉपर्टीचा व्यवहार करतो तेव्हा त्या खरेदी विक्रीचे व्यवहारामध्ये आपल्याला अनेक गोष्टींची काळजी खूप गरजेची असते व त्या प्रॉपर्टी संबंधीची कायदेशीर कागदपत्रे ही खूप महत्त्वाची असतात व ते कागदपत्रे तपासून पाहणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते.
आपल्याला प्रॉपर्टीच्या कागदपत्रावरून त्या प्रॉपर्टीचा मालकी हक्क तसेच इतर महत्त्वाच्या सगळ्या बाबी कळण्यास मदत होते. त्यामुळे कुठल्याही प्रॉपर्टीचा व्यवहार करण्याअगोदर आपण आवश्यक ती कागदपत्रे तपासूनच पुढे पाऊल उचलणे गरजेचे असते. नाहीतर उगीचच पैसे जाऊन मानसिक त्रास होतो व काही कायदेशीर बाबी देखील या माध्यमातून उद्भवू शकतात.

जर आपण प्रॉपर्टीच्या संदर्भात असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये एन्कम्बरन्स सर्टिफिकेट म्हणजेच इसी हे कागदपत्र खूप महत्त्वाचे असते. कारण या कागदपत्राच्या माध्यमातून तुम्हाला सदर मालमत्तेबद्दल सगळी आवश्यक माहिती मिळत असते. कारण मालमत्तेची सगळी माहितीची नोंद यामध्ये केलेली असते.
काय आहे एन्कम्बरन्स सर्टिफिकेटचे महत्व?
कोणत्याही मालमत्तेच्या बाबतीत एन्कम्बरन्स सर्टिफिकेट खूप महत्त्वाचे असते. कारण या प्रमाणपत्रांमध्ये मालमत्तेबद्दल सगळी महत्वाची माहितीची नोंद केलेली असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर या प्रमाणपत्रांमध्ये तुम्हाला सदर मालमत्तेचा मालकी हक्क कोणाला आहे व मालमत्तेवर कोणताही थर्ड पार्टी क्लेम आहे का?
तसेच कोणत्याही प्रकारचा काही कायदेशीर खटला संबंधित प्रॉपर्टीवर आहे का? सदर मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे कर्ज चालू आहे का किंवा चालू असल्यास त्याची परतफेड झाली आहे की नाही इत्यादी बऱ्याच बाबी नमूद केलेल्या असतात.
तसेच या मालमत्तेवर किती वर्षापासून व्यवहार सुरू आहेत व ही मालमत्ता तयार झाली तेव्हापासून ती किती लोकांकडे आहे व सध्या तिचा मालक कोण आहे?
ही सगळी महत्त्वाची माहितीची नोंद यामध्ये असते.सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे मालमत्ता कायदेशीर भार आणि काही आर्थिक बोजापासून मुक्त आहे की नाही हे या कागदपत्राद्वारे समजते.
या सर्टिफिकेटची गरज कधी भासते?
1- जेव्हा एखादी मालमत्ता खरेदी केली जाते आणि त्या मालमत्ते बाबत आपण संबंधित मालकाशी व्यवहार करतो तेव्हा हे प्रमाणपत्र गरजेचे असते. जसे आपण पाहिले की हा एक पुरावा असतो की सदर मालमत्ता ही कुठल्याही कायदेशीर किंवा आर्थिक भारापासून मुक्त आहे.
2- जेव्हा मालमत्ता खरेदी करण्यासाठी होम लोन घेतले जाते तेव्हा कर्जाचा अर्ज मंजूर करण्याअगोदर बँक तुमच्याकडून हे सर्टिफिकेट मागू शकतात. तेव्हा मात्र तुम्हाला या सर्टिफिकेटची गरज भासते.
3- तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याकरिता भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढल्यास तुमचा नियोक्ता तुमच्याकडून हे सर्टिफिकेट मागू शकतो.
4- जेव्हा आपण एखाद्या मालमत्तेचा व्यवहार करतो तेव्हा खरेदीदार हे सर्टिफिकेट मागू शकतो आणि तेव्हा ते त्याला दाखवावे लागते..
एन्कम्बरन्स सर्टिफिकेट कसे बनवतात?
भारतातील काही राज्यांमध्ये हे भार प्रमाणपत्र मिळवण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ऑफलाइन पद्धतीने हेच प्रमाणपत्र मिळवायचे असेल तर तुम्हाला त्या भागातील तहसीलदार कार्यालयामध्ये जावे लागते व त्या ठिकाणी एक फॉर्म भरावा लागतो.
तसेच विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करावे लागतात व त्यानंतर हे सर्टिफिकेट 15 ते 30 दिवसांच्या कालावधीत जारी केले जाते. तुम्हाला सदर प्रॉपर्टीचे 12 ते 30 वर्षापर्यंतचे हे सर्टिफिकेट मिळू शकते.