Real Estate Tips:- रिअल इस्टेट क्षेत्रामधील गुंतवणूक पाहिली तर ती प्रामुख्याने जागा किंवा प्लॉट खरेदी करणे यामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. आपल्याला माहित आहे की, जागांचे तसेच प्लॉट किंवा घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे अशा प्रकारचे व्यवहारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पैसे मोजावे लागतात.
त्यामुळे अशा पद्धतीचे व्यवहार करताना खूप बारीक सारीक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला पैसे जाऊन त्रास होऊ नये हा त्यामागचा एक प्रमुख उद्देश असतो. कारण आपण बऱ्याचदा ऐकतो किंवा वाचतो की अशा प्रकारच्या व्यवहारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते.
एकच जागा एकापेक्षा जास्त व्यक्तींना विकली जाते व बऱ्याच जणांची आर्थिक फसवणूक या माध्यमातून होते. त्यामुळे तुम्हाला देखील एखादी जागा किंवा प्लॉट किंवा घर खरेदी करायचे असेल तर त्याकरिता तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते.
जमीन किंवा प्लॉट खरेदी करा,परंतु अगोदर या गोष्टी बघा
1- सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही जी जमीन घेत आहात ती जोपर्यंत शेतजमीन या कॅटेगरीमध्ये येते तोपर्यंत अशा जमिनीचा वापर किंवा विक्री प्लॉट म्हणून करता येत नाही व अशी जमीन प्लॉट म्हणून तुम्ही खरेदी करू नये.
जर कुठल्याही ड्रायव्हर्जन शिवाय शेतजमीन कोणी विकत असेल तर तुम्ही अशा जमिनीवर प्लॉट घेत असाल तर तुमची आर्थिक फसवणूक शंभर टक्के होऊ शकते.
याकरिता तुम्ही संबंधित महानगरपालिका किंवा काही स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्यांची मान्यता तपासल्यानंतरच संबंध बिल्डरकडून घर किंवा प्लॉट किंवा जमीन खरेदी करावी.
2- तसेच ज्या जमिनीवर प्लॉट किंवा इमारत विकली जात आहे त्या जागेची मालकी नेमकी कुणाकडे आहे? हे देखील तपासून घेणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तीच्या नावावर सदर जमीन रजिस्टर आहे, त्याच व्यक्तीच्या स्वाक्षरीने विक्रीपत्र करून घेणे गरजेचे असते. नाहीतर मग तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
3- अशाप्रकारे मालमत्ता खरेदी करण्याअगोदर या मालमत्तेचे नामांतरण तपासणे गरजेचे असते. महानगरपालिका असो किंवा ग्रामपंचायत यांच्या रेकॉर्डमध्ये ती मालमत्ता कोणाच्या नावावर नोंदवली आहे? हे तपासून पहावे.
तसेच महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीच्या मालमत्ता कर खात्यामध्ये सदर मालमत्ता कोणत्या नावाने नोंद झाली आहे व त्या मालमत्तेचा कर कोणाच्या नावावर भरला जातो? याची देखील तपासणी करून घ्यावी.
4- तसेच ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या नोंदणीमध्ये या संदर्भात काही नोंद आहे का? हे देखील तुम्ही तपासून पहावे. कारण मालमत्तेचे नामांकन खूप गरजेचे असते
सरकारी नोंदीमध्ये ती व्यक्ती मालमत्तेची मालक असून अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की, मालमत्तेचा मालक एक असतो व हस्तांतरण दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असते. असे जर तुम्हाला दिसून आले तर अशी मालमत्ता खरेदी न केलेली बरी.
याशिवाय…..
संबंधित जागा किंवा प्लॉट त्या व्यक्तीच्या नावावर कशाप्रकारे झाली याचा देखील तपशील तपासावा. कायदेशीर पद्धतीने त्या जमिनीचा किंवा जागेचा सर्च रिपोर्ट बनवून घ्यावा आणि वर्तमानपत्रामध्ये जाहीर नोटीस देखील देऊन टाकावी.
एवढेच नाही तर महानगरपालिका व राज्य शासनाच्या आरक्षणासंदर्भातली कागदपत्रे तपासावी. तसेच सदर मालमत्ता कोणत्या झोनमध्ये म्हणजेच येलो, ग्रीन झोनमध्ये आहे की नाही हे देखील पाहून घ्यावे. तसेच भूसंपादनासंदर्भातील कागदपत्रे पडताळून घ्यावेत.