Success Story : अलीकडे सुशिक्षित तरुणाचा शेतीकडे कल वाढू लागला आहे. अनेक सुशिक्षित तरुणांनी आता शेती व्यवसायातच आपलं करिअर घडवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यातून आता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग समोर येत आहेत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातही एका सुशिक्षित तरुणाने असाच कौतुकास्पद प्रयोग केला आहे. तालुक्यातील मौजे दिपेवडगाव येथील अनिल औटे या बीएससी एग्रीकल्चर पदवीधारक तरुणाने शिक्षणानंतर नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला.
मात्र पारंपारिक पिकांची शेती करणे ऐवजी या युवकाने विदेशी भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला. वास्तविक, शिक्षणानंतर त्यांनी काही काळ नोकरी केली पण नोकरींत मन काही रमेना. म्हणून मग या अनिल यांनी कर्ज काढून शेतीमध्ये नवंनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली.
याच प्रयोगाचा एक भाग म्हणून त्यांनी विदेशी भाजीपाला पीक झुकिनीची शेती सुरू केली. या पिकाची माहिती त्यांना सांगली जिल्ह्यातील लाडेगाव येथील विजय देसाई या शेतकऱ्याकडून मिळाली. देसाई यांच्याकडून या पिकाची माहिती मिळवल्यानंतर त्यांनी आपल्या तीच गुंठे शेत जमिनीत याची लागवड केली. लागवड केल्यानंतर 22 व्या दिवशीच यापासून त्यांना उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली.
या पिकातून त्यांना रोजाना साडेचारशे किलो इतके उत्पादन मिळू लागले. मुंबई पुणे यांसारख्या मार्केटमध्ये या शेतमालाचे त्यांनी विक्री केली. या पिकातून आत्तापर्यंत त्यांनी सात लाख 80 हजारच उत्पन्न मिळवलं असून यासाठी एक लाख वीस हजाराचा खर्च त्यांना आला आहे. जवळपास साडेसहा लाख रुपये इतकां निव्वळ नफा या पिकातून त्यांना मिळाला आहे.
अनिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या 30 गुंठे जमीनीत पाच फूटचे बेड तयार करून मल्चिंग पेपरच्या वापराने या पिकाची लागवड केली. पंधराशे पिवळ्या कलरच्या आणि पंधराशे हिरव्या कलरच्या झूकिनी रोपांची लागवड त्यांनी केली होती.
निश्चितच एक एकर पेक्षा कमी जमिनीत लाखो रुपयांचे कमाई करत या युवा शेतकऱ्याने इतरांपुढे एक नवीन आदर्श घालून दिला आहे. आपल्या शिक्षणाचा यथायोग्य वापर करत या तरुण शेतकऱ्याने शेतीमध्ये साधलेली ही प्रगती इतरांसाठी मार्गदर्शक असून काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल केला तर निश्चितच लाखोंची कमाई होऊ शकते हेच या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.