गेल्या एक ते दीड वर्षापासून जर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला किंवा पिकांचे बाजारभाव पाहिले तर गेल्या ते दीड वर्षापासून आले आणि टोमॅटो या ठिकाणी शेतकऱ्यांना बरापैकी पैसा देण्याचे काम केलेले आहे. तसे पाहायला गेले तर आता बरेच शेतकरी विविध पिकांचे प्रयोग करतात व या नावीन्यपूर्ण प्रयोग यांच्या माध्यमातून कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील चांगले उत्पन्न घेत लाखोंचा नफा मिळवताना आपल्याला दिसून येत आहे. \
या सगळ्या शेती पद्धतीमध्ये तरुण शेतकरी पुढे असल्याचे आपल्याला सध्या दिसून येते. अशाच पद्धतीने वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष या गावचे सुहास राजाराम पवार या तरुण शेतकऱ्याने दीड एकरामध्ये सातारी आल्याची लागवड केलेली होती.
परंतु या आल्याने या शेतकऱ्याला तब्बल तीस लाखांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. कायम वेगवेगळ्या पिकांचे नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या सुहास पवार यांची यशोगाथा आपण या लेखात थोडक्यात बघणार आहोत.
दीड एकरात आले पिकातून घेतले तीस लाखांचे उत्पन्न
वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष गावचे तरुण प्रयोगशील शेतकरी सुहास पवार यांनी दीड एकरामध्ये सातारी आल्याची लागवड केलेली होती. आल्याचे योग्य व्यवस्थापन ठेवून त्यांनी तब्बल 30 टनापर्यंत उत्पादन मिळवण्यात मजल मारली. परंतु या 30 टन उत्पन्नातून त्यांना तब्बल तीस लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
नवनवीन पिकांचे प्रयोग कसे शेतकऱ्यांना फायद्याचे होऊ शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे. तसेच पिकांमधील सातत्य कसे शेतकऱ्याला फायद्याचे ठरते याचे देखील उदाहरण आपल्याला या माध्यमातून मिळते.
आल्याचे भाव कितीही पडले किंवा आल्याचे पीक परवडले नाही तरी देखील सुहास पवार यांनी मात्र गेल्या आठ वर्षापासून आले पिकाच्या लागवडीमध्ये सातत्य ठेवले व याच आले पिकाने त्यांना आज लखपती बनवलेले आहे.
अशाप्रकारे केले खत व्यवस्थापन
सुहास पवार यांनी आले लागवड करण्याअगोदर डीएपी तसेच पोटॅश, कॉम्बिफेंक ही रासायनिक खते, तसेच दुय्यम अन्नद्रव्य व निंबोळी पेंड, करंजी पेंड, एम 45 तसेच ब्ल्यू कॉपर, रिझल्ट अल्ट्रा चा वापर करून बेसल डोस दिला व कंद कुजू नयेत म्हणून ट्रायकोडर्माचा वापर कौशल्यपूर्ण रीतीने केला. त्यानंतर आले लागवड करून दहा दिवसांनी तणनाशकाचे फवारणी घेतली.
तसेच प्रत्येक महिन्यातून एकदा ठिबकच्या माध्यमातून गंधक व प्रत्येक आठव्या दिवशी पिकांच्या वाढीनुसार विद्राव्य खते ठिबकच्या माध्यमातून देण्यात आली. जेव्हा योग्य व्यवस्थापनाने पिकाची पूर्ण वाढ झाली तेव्हा रोटरचा वापर करून पिकाला पहिली भर देण्यात आली व यावेळी मात्र 10:26:26 च्या तीन गोण्या या पिकाला दिल्या.
जेव्हा पिक पूर्ण वाढले तेव्हा साडेतीन महिन्यानंतर दुसरी भर व बेसल डोस दिला. तसेच प्रत्येक आठवड्याला वातावरण पाहून करपा, कंदमाशी नियंत्रणाकरिता वेळोवेळी बुरशीनाशक व कीटकनाशकांची फवारणी घेतली. तसेच रासायनिक खते तर दिलेच परंतु जिवाणू स्लरी देखील ठिबकच्या माध्यमातून दिली.
त्यासोबतच फिश अर्क व दशपर्णी अर्क तसेच प्रभाती बायो फर्टीलायझरचा खेकडा अर्क याचा देखील त्यांनी वापर केला. अशा पद्धतीने योग्य व्यवस्थापन करून त्यांनी आल्याचे भरघोस उत्पादन घेतले व आले पीक काढणी केल्यानंतर शेतकऱ्यांना जागेवरच बियाणे म्हणून त्याची विक्री केली. विशेष म्हणजे त्यांना प्रतिकिलोला 110 रुपयाप्रमाणे दर मिळाला व संपूर्ण पिकाची विक्री शेतामधूनच झाली.