Banana Farming: व्यक्तीला जर एखाद्या व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल किंवा वेगळ्या स्वरूपामध्ये तो व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायातील सगळे बारकावे आपल्याला अगोदर अभ्यासावे लागतात व केलेला अभ्यास व घेतलेला अनुभव यांचा वापर व्यवसायामध्ये करून व्यवसाय विकसित करता येतो व त्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न देखील लाखोत मिळवता येते.
याच पद्धतीने शेती व्यवसायाचे पाहिले तर एक पारंपारिक स्वरूप व पारंपारिक पीक पद्धती यामुळे कायम तोट्यात जाणारा व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहण्यात येत होते. परंतु आता शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती व्यवसाय आता नावारुपाला आलेला आहे.

यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करून शेतीमध्ये आमुलाग्र असा बदल घडवून आणलेला आहे. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण केरळ राज्यातील विनोद सहदेवन नायर या शेतकऱ्याची यशोगाथा पाहिली तर हा शेतकरी बनाना मॅन म्हणून प्रसिद्ध असून या शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये केळीच्या 500 पेक्षा अधिक जातींची लागवड करून एक वेगळाच विक्रम प्रस्थापित केला आहे.
केळी लागवडीच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपयांची कमाई विनोद हे करत असून केळीच्या विविध जातींविषयीची जनजागृती करण्यासाठी ते काम देखील करत आहेत. भौतिकशास्त्र विषयांमध्ये बीएससी केलेले विनोद सहदेवन शेती व्यवसायाकडे कसे वळले व केळी पिकाची निवड त्यांनी कशा पद्धतीने केली? याबद्दलची माहिती या लेखात बघू.
विनोद सहदेवन नायर यांची यशोगाथा
विनोद सहदेवन नायर हे तिरुअनंतपुरमचे रहिवासी असून ते उच्चशिक्षित आहेत. त्यांनी भौतिकशास्त्र विषयांमध्ये बीएससी केली व बीएससी केल्यानंतर नोकरीला सुरुवात केली.
नोकरी करत असतानाच त्यांनी कोची या ठिकाणी वेब डिझाईनिंग कंपनी सुरू केली. हा सगळा प्रवास सुरू असताना मध्येच मात्र त्यांच्या आईचे दुर्दैवी निधन झाले व त्यानंतर मात्र त्यांना घरी यायला लागले. घरी येऊन काय करावे? हा प्रश्न मनात असताना त्यांनी ठरवले की आपल्या कुटुंबाचे शेती आहे तर या शेतीमध्ये आता काहीतरी वेगळे करावे अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतला व इथूनच शेतीचा प्रवास सुरू झाला.
शेती करायचे निश्चित झाल्यावर शेती करायची परंतु ती संपूर्ण वेगळ्या पद्धतीने करायची असे त्यांनी ठरवले. त्यामुळे वेगळेपण जपण्यासाठी त्यांनी केळी लागवड करावी याकरिता केरळमध्ये नसणाऱ्या केळीच्या जाती शोधायला सुरुवात केली व याकरिता त्यांनी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बंगाल,
ओडिसा आसाम आणि मणिपूर सारख्या राज्यांमध्ये दौरे केले व या ठिकाणहून केळीचे अधिक वाण घेतले व त्यासोबतच विविध फलोत्पादन विभाग व संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांशी संपर्क साधून अधिकची माहिती मिळवली.
यामध्ये त्यांना दिसून आले की प्रत्येक प्रकारच्या केळीचा एक विशिष्ट वेगळेपण आहे व उदाहरणच घ्यायचे झाले तर मनोरंजितम केळीचा प्रकार हा कन्याकुमारीतील असून ही केळी तिच्या खास सुगंधासाठी प्रसिद्ध आहे. जुन्या काळी लोक शुभ कार्यक्रमाप्रसंगी तसेच लग्न समारंभात आणि सण उत्सवाच्या कालावधीत घरात या जातीची केळी टांगत असत.
अशाप्रकारे वेगवेगळे गुणवैशिष्ट्य असलेल्या केळीच्या 500 जाती त्यांनी त्यांच्या शेतात लागवड केलेल्या आहेत. यामध्ये रेड केळी आणि ब्लू जावा तसेच लेडीज केळी इत्यादी आंतरराष्ट्रीय केळीच्या जातींचा देखील समावेश आहे.
आज महिन्याला आहे एक लाख रुपये पेक्षा जास्त कमाई
विनोद सहदेवन नायर यांनी मलेशिया तसेच आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, होंडूरास आणि हवाई यासारख्या देशांमध्ये देखील प्रवास केला आणि अनेक दुर्मिळ किनारी प्रदेशातील हवामानात टिकतील अशा जाती मिळवल्या व प्रत्येक जातीची लागवड शेतात केली.
आज ते त्यांच्या शेतातून उत्पादित होणाऱ्या वेगवेगळ्या जातींच्या केळीची विक्री घाऊक बाजारात करतात व यातून प्रत्येक महिन्याला एक लाख रुपयांपेक्षा अधिकचा नफा ते मिळवतात. केळीच्या विविध जातींबद्दल जनजागृती करता यावी याकरिता विनोद यांनी फेसबुक ग्रुप देखील तयार केला आहे.