सध्या खाद्यपदार्थांमधील भेसळ हा एक ज्वलंत व गंभीर असा प्रश्न असून मोठ्या प्रमाणावर सध्या भेसळयुक्त पदार्थांचे प्रकरणे समोर येत आहेत. अगदी दुधापासून तर स्वयंपाक घरात वापरण्यात येत असलेल्या जिऱ्यामध्ये देखील भेसळ केली जाते. विशेष म्हणजे अशी भेसळयुक्त पदार्थ आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा ते शुद्ध आहेत की भेसळयुक्त हे देखील ओळखणे आपल्याला कठीण जाते.
अशा प्रकारे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जर खाल्ले तर त्याचा विपरीत परिणाम हा व्यक्तीच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे आपल्याला बाजारातून कुठलेही खाद्यपदार्थ खरेदी करताना ते भेसळयुक्त आहेत की शुद्धता ओळखता येणे खूप गरजेचे आहे. याच मुद्द्याला धरून जर आपण गुळाचा विचार केला तर घरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुळाचा वापर केला जातो व आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील गुळ खूप फायद्याचा आहे.

गुळामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारची भेसळ केली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे गोड खरेदी करताना तो शुद्ध आहे की भेसळयुक्त हे आपल्याला ओळखता यायला हवे.
याकरता तुम्ही साध्या गोष्टी वापरून पाहिल्या तरी तुम्हाला बनावट गुळ ओळखता येतो. जर आपण भेसळयुक्त किंवा बनावट गुळाचा विचार केला तर तो स्वच्छ व आकर्षक दिसण्यासाठी त्यामध्ये सोडा वापरलेला असतो व त्यामुळे गोड पांढरा दिसतो. अशाप्रकारे अनेक रसायनांची देखील भेसळ केली जाण्याची शक्यता यामध्ये असते.
या सोप्या पद्धती वापरा आणि गुळामधील भेसळ ओळखा
1- पाण्याचा वापर– केमिकलयुक्त गुळ जर आपण घेतला व तो खाल्ला तर तो प्रामुख्याने थोडासा खारट किंवा कडूदेखील लागू शकतो.अशा परिस्थितीमध्ये गूळ खरा आहे की बनावट गूळ ओळखण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता.
याकरिता पाण्यामध्ये अगोदर गूळ विरघळून घ्यावा. जर गुळ पाण्याखाली स्थिर झाला किंवा जमा झाला तर तो भेसळ युक्त असू शकतो. त्या तुलनेमध्ये जर गुळ पाण्यात चांगल्या पद्धतीने विरघळला तर तो शुद्ध असू शकतो.
2- रंगावरून ओळखा गूळ– गुळ हा त्याच्या रंगावरून देखील ओळखता येतो. गुळ जर पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचा असेल तर त्यामध्ये रसायने असू शकतात.
साधारणपणे शुद्ध गुळाचा रंग हा गडद तपकिरी किंवा काळा असतो. गुळाचा रंग जितका गडद तितका तो शुद्ध असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे रंगावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
3- वजनावरून ओळखा गुळाची शुद्धता– भेसळीत गुळामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेटची भेसळ केली जाते. गूळ चांगला दिसावा म्हणून त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि पॉलिश केले जाते व त्यामुळे गुळाचे वजन वाढते.
जर गुळ वजनाने जास्त असेल तर तो भेसळयुक्त किंवा नकली असू शकतो. याप्रकारे तुम्ही वजनाने देखील गुळ हे भेसळ युक्त आहे की शुद्ध हे ओळखू शकतात.