Agri Machinery:- कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणावर यंत्रांचा वापर होत असल्यामुळे आता शेतीतील अनेक महत्त्वाची कामे कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना पूर्ण करता येणे शक्य झालेले आहे. अगदी शेतीची पूर्व मशागत असो किंवा पिकांची लागवड, पिकांचे आंतरमशागत ते पिकांची काढणीपर्यंत कामी येणारी उपकरणे आता विकसित झाल्यामुळे शेतीमध्ये शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळताना दिसून येत आहे.
यामध्ये देशातील विविध कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन संस्थांचे योगदान अनमोल असे आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण झारखंड राज्यातील रांची या ठिकाणाच्या बिरसा कृषी विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर या विद्यापीठाने बटाटा काढण्यासाठी एक नाविन्यपूर्ण यंत्र विकसित केले असून या माध्यमातून आता बटाट्याचे काढणी अगदी वेगात आणि कमी वेळात करू शकणार आहेत.
बिरसा कृषी विद्यापीठाने विकसित केले बटाटा काढणी यंत्र
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून झारखंड राज्यातील रांची येथील बिरसा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून एक अनोखे बटाटा काढणी यंत्र विकसित करण्यात आलेले असून या यंत्रामुळे आता बटाटा काढण्याचे काम अगदी कमी वेळेमध्ये व कमीत कमी खर्चात व मजुरांशिवाय करता येणे शक्य होणार आहे.
बटाटा उत्पादक शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन हे बटाटा थ्रेशर मशीन विकसित करण्यात आल्याचे बिरसा कृषी विद्यापीठाचे पर्यवेक्षक दिलीप यांनी बोलताना सांगितले. त्यांनी या मशीनविषयी माहिती देताना म्हटले की, या यंत्राच्या साह्याने शेतकरी पाच एकर जमिनीतून एका तासामध्ये बटाटे काढू शकतात.
कारण बटाटा काढण्याची जी काही पारंपारिक पद्धती आहेत त्यामध्ये बटाटा काढायला खूप वेळ लागतो व मजुरांची देखील जास्त आवश्यकता भासते. त्यामुळे साहजिकच खर्च वाढतो व त्याशिवाय हाताने जेव्हा बटाटे काढले जातात तेव्हा दहा टक्के बटाटे खराब होण्याची भीती असते.
परंतु या नवीन विकसित झालेल्या यंत्राच्या साह्याने शंभर टक्के बटाट्यांची सुरक्षितपणे काढणी करता येणे शक्य असल्याचे देखील त्यांनी म्हटले. हे नवीन विकसित करण्यात आलेले बटाटा थ्रेशर मशीनमध्ये एक मोटर असून तिला चालवण्यासाठी डिझेलची आवश्यकता असते.
कमीत कमी एक लिटर डिझेलमध्ये शेतकऱ्यांना पाच एकर जमिनीतून बटाट्याची काढणी करता येणे शक्य आहे. या बटाटा थ्रेशर मशीनची रचना पाहिली तर त्यामध्ये जी काही मोटर आहे त्याखाली चाकू सारखे धारदार यंत्र आहे. हे धारदार यंत्र बटाटे काढण्यासाठी पूर्णपणे मातीच्या आत जाते आणि बटाटे वरच्या बाजूला फेकते.
या मशीनचा फायदा पाहिला तर आपल्याला एका उदाहरणाच्या माध्यमातून घेता येईल. समजा पाच एकर बटाटे जमिनीतून काढण्यासाठी साधारणपणे सात दिवस लागतात व पाच ते सहा मजुरांची आवश्यकता भासते. मात्र या यंत्राच्या साह्याने हे काम फक्त दोन मजुरांच्या मदतीने केले जाते. हे ट्रॅक्टर चलीत यंत्र असून ते ट्रॅक्टरला जोडून चालवले जाते.
किती आहे या यंत्राची किंमत?
बिरसा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या या बटाटा थ्रेशर मशीनची किंमत 33 हजार रुपये इतकी आहे.