शेती क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.परंतु शेतीसाठी करावे लागणारे कामे व त्यासाठी लागणारा वेळ यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बचत करणे शेतकऱ्यांना शक्य झालेले आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये विविध कृषी यंत्रांचा वापर तसेच आधुनिक पीक लागवड पद्धती व आधुनिक पिकांची लागवड या सगळ्या गोष्टींचा आधुनिक शेतीमध्ये अंतर्भाव होतो.
शेतीमध्ये आता जवळपास शेती तयार करण्यापासून तर पिकांची लागवड आणि पिकांच्या काढणीपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे आता दिवसेंदिवस शेती क्षेत्राचे स्वरूप पालटताना दिसून येत आहे.
याच मुद्द्याला धरून जर आपण अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ड्रायव्हर विना ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी केली आहे. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका सरळ रेषेमध्ये पेरणी होत असल्याचे देखील शेतकऱ्याने सांगितले आहे.
अकोल्याच्या शेतकऱ्याने केली चालक विना ट्रॅक्टरच्या सहाय्याने सोयाबीनची पेरणी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकोला जिल्ह्यातील राजू वरोकार यांनी जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करत जीपीएस कनेक्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरच्या माध्यमातून सोयाबीनची पेरणी केली आहे. उमरी हे अकोला जिल्ह्यातील त्यांचे गाव असून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन पेरणीचा हा अनोखा प्रयोग केला असून या पेरणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे.
काय आहे जीपीएस कनेक्ट सॉफ्टवेअर?
जीपीएस कनेक्ट हे सॉफ्टवेअर खूप महत्त्वाचे असून या माध्यमातून चालका विना चालणाऱ्या ट्रॅक्टरद्वारे शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केली जाते व महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा देखील या शेतकऱ्याने केला आहे. शेतामध्ये जर तुम्हाला ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी करायची असेल तर तुम्हाला ट्रॅक्टर साठी चालकाची गरज भासत नाही.
तसेच या माध्यमातून अगदी सरळ रेषेमध्ये पेरणी होते. त्यामध्ये जर्मन तंत्रज्ञानाचे एक उपकरण बसवण्यात आले आहे व हे उपकरण शेताच्या एका बाजूला ठेवावे लागते. हे उपकरण जीपीएस कनेक्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ट्रॅक्टरशी कनेक्ट होते.
या पद्धतीने चालकाविना ट्रॅक्टरचे संपूर्ण कंट्रोल करता येते. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे म्हटले म्हणजे सोयाबीनची पेरणी ट्रॅक्टर स्वतःहून अगदी सरळ रेषेमध्ये करते. त्यामुळे पिकामध्ये पेरणीनंतर ज्या काही अंतर्मशागतीचे कामे करावा लागतात त्यामध्ये येणाऱ्या समस्या या तंत्रज्ञानाद्वारे केलेले पेरणीमुळे कमी होतील किंवा दूर होतील असे देखील त्यांनी म्हटले.