व्यक्तीमध्ये जर प्रयोगशीलता आणि काहीतरी नवीन करण्याची जिद्द असेल तर या माध्यमातून अनेक नवनवीन शोध लागतात. कारण प्रयोगशीलता हा गुण असा आहे की या माध्यमातून आपण जेव्हा काही गोष्टी करत असतो तेव्हा प्रयोग करत असताना आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी गवसत असतात
व माध्यमातून सगळ्यांना उपयोगी पडेल असा काहीतरी अविष्कार निर्माण होतो. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण पिठाच्या गिरणीचा विचार केला तर ती साधारणपणे विजेवर चालते हे आपल्याला माहिती आहे. परंतु विजेशिवाय चालणारी आणि पॅडलवर ऑपरेट होणारी पिठाची गिरणी एका शेतकऱ्याने जुगाड करून तयार केले आहे.
हे जर तुम्हाला कोणी सांगितले तर खरं वाटणार नाही. परंतु हे खरे आहे. जालना जिल्ह्यातील अर्जुन शिंदे या शेतकऱ्याने पॅडलच्या साह्याने ऑपरेट होणारी पिठाची गिरणी तयार केली आहे.
विशेष म्हणजे ही गिरणी चालवायला कुठल्याही प्रकारच्या विजेची गरज भासत नाही. काहीतरी नवीन तयार करावे ही इच्छा मनात असल्यामुळे ते वेगवेगळे प्रयोग करत असताना त्यांच्या हातून हा आविष्कार तयार झाला आहे.
या घटनेने मिळाली प्रेरणा
पेंडल वर चालणारी पिठाची गिरणी तयार करण्याची प्रेरणा कशी मिळाली याबाबत माहिती देताना अर्जुन शिंदे यांनी सांगितले की, त्यांच्या गावांमध्ये काही वर्षांपूर्वी पावसामुळे विजेचे खांब मोठ्या प्रमाणावर पडले व त्यामुळे बरेच दिवस गावात वीज नव्हती.
त्याप्रसंगी बऱ्याच घरांमधील गव्हाचे किंवा बाजरीचे पीठ संपले होते व विज नसल्यामुळे गिरणी बंद पडल्याने बऱ्याच जणांना ते दिवस भात खाऊन काढावे लागलेत. त्यामुळे या प्रसंगावरून अर्जुन शिंदे यांच्या मनामध्ये आले की आपण काहीतरी करून विजेशिवाय चालणारी गिरणी बनवावी व त्या कल्पनेतून त्यांनी पेंडल वर चालणारी गिरणी बनवली.
अर्जुन शिंदे यांनी बनवलेल्या पिठाच्या गिरणीची मागणी भारतातच नाही तर विदेशातून देखील होत आहे. या गिरणीमुळे लोकांना विज नसताना देखील पीठ मिळते व पेडल वर ऑपरेट होत असल्यामुळे व्यायाम देखील होतो. ही गिरणी तयार करण्यासाठी त्यांनी सायकलची साखळी, लोखंडी पाईप तसेच सायकलची सीट व सायकलचे पेंडल्स वापरलेले आहेत.
या गिरणीला वाढत आहे मागणी
चार वर्षाच्या कष्टानंतर आता अर्जुन शिंदे ही पेंडलवर ऑपरेट होणारी गिरणी विक्री करत असून देशातील विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ही गिरणी विकली जात आहे. एवढेच नाहीतर परदेशातून देखील या गिरणीला मोठे मागणी असल्यामुळे ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांना ग्राहकांकडून एक महिन्याचा कालावधी मागून घ्यावा लागत आहे.