Monsoon Update:- सध्या सगळीकडे प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत असून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परत महाराष्ट्रामध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र होते.
परंतु परत आता उन्हाची तीव्रता वाढल्याने उकाड्याने नागरिक हैराण झालेले आहेत. परंतु त्यातच मान्सूनच्या आगमनाविषयीची दिलासादायक बातमी समोर आली असून भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून अंदमान निकोबार मध्ये पोहोचला असून साधारणपणे 31 मे पर्यंत केरळमध्ये एन्ट्री करेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
साधारणपणे मागच्या वर्षी देखील 19 मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर मानसून दाखल झाला होता. परंतु केरळमध्ये पोहोचायला नऊ दिवस जास्त लागले होते. परंतु या वेळेस तारखेच्या अगोदरच मान्सूनची एन्ट्री केरळमध्ये होईल अशी शक्यता आहे.
मान्सूनच्या आगमनाविषयी भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली महत्त्वाची माहिती
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार अंदमान निकोबारमध्ये मान्सूनची एन्ट्री झाली असून 31 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचेल. यावर्षी केरळमधील मान्सूनचे आगमन हे तारखेपूर्वीच म्हणजेच एक जून अगोदरच होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
परंतु यामध्ये चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली असून त्यानुसार 28 मे ते 3 जून दरम्यान कधीही मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार नऊ ते 16 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन होईल व त्यासोबतच राजस्थानमध्ये 25 जून ते सहा जुलै पर्यंत मान्सून पोहोचेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
त्यासोबतच उत्तर प्रदेश राज्यामध्ये 18 ते 25 जून आणि बिहार झारखंडमध्ये 18 जून पर्यंत मान्सूनची एन्ट्री होईल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
यावर्षी ला निनामुळे चांगला पाऊस होण्याची शक्यता
गेल्या वर्षी आपल्याला माहित आहे की एल निनो सक्रिय झालेला होता व त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला होता. परंतु यावर्षी एल निनो ची स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात आली असून येणाऱ्या तीन ते पाच आठवड्यामध्ये ला नीनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये यावर्षी चांगला पाऊस अपेक्षित आहे.
यावर्षी 106% म्हणजे 87 सेमी पाऊस पडण्याची शक्यता
गेल्या महिन्यामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले होते की, देशामध्ये यंदा सामान्य मान्सूनपेक्षा चांगला पाऊस पडेल व सरासरीपेक्षा 104 ते 110 टक्के पाऊस हवामान विभागाच्या माध्यमातून चांगला मानला जातो. हे शेती पिकांसाठी खूप चांगले लक्षण आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे की,
यावर्षी १६० टक्के म्हणजे 87 सेंटीमीटर पाऊस पडू शकतो. पावसाळ्याचा जर आपण चार महिन्याचा कालावधी पकडला तर त्यामध्ये दीर्घ कालावधीची पावसाची सरासरी ही 468.6 मिलिमीटर म्हणजे 86.86 सेंटीमीटर इतकी आहे. म्हणजेच पावसाळ्यामध्ये इतका पाऊस पडणे गरजेचे असते. तसेच स्कायमेट देखील जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये सरासरी किंवा सामान्य पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.