Mumbai Pune Nashik Rain Alert : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला होता. तथापि, गेल्या जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरी पेक्षा जास्तीच्या पावसाची नोंद करण्यात आली. जुलै महिन्यात अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती तयार झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेच याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना देखील याचा मोठा फटका बसला.
पूरस्थितीमुळे गेल्या महिन्यात काही काळ सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत पाहायला मिळाले. दरम्यान, आता ऑगस्ट महिन्याची सुरुवातही तशीच काहीशी झाली आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पूरजन्य परिस्थिती तयार होत असून यामुळे सर्वसामान्य जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगला जोराचा पाऊस झाला आहे.
दरम्यान, आयएमडीने आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पुणे, नाशिक सह राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस होणार असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांना रेड तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय काही जिल्ह्यांना येलो अलर्टही मिळाला आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार आज मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाण्यासह पालघर जिल्ह्यात पावसाची तीव्रता सर्वाधिक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या संबंधीत जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी झाला आहे.
याशिवाय आज एक-दोन जिल्हे वगळता संपूर्ण मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातही सगळीकडे जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील आज जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्याला आज येल्लो अलर्ट मिळाला आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्याला आज कोणताच अलर्ट देण्यात आलेला नाही. अर्थातच अहमदनगर जिल्ह्यात आज हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आज पावसाचा जोर फारसा पाहायला मिळणार नाही. येथे हवामान खात्याने ग्रीन अलर्ट दिला आहे. पण, आज कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे ज्या ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे आणि जिथे अतिवृष्टीची शक्यता आहे त्या ठिकाणी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.













