शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: प्रशांत आणि हिंदी महासागरामध्ये तयार होत आहे मान्सूनला अनुकूल वातावरण, चांगल्या मान्सूनचे मिळाले संकेत

Ajay Patil
Published:
monsoon

मागच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये अल निनोच्या प्रभावाने खूप कमी पाऊस झाला व बऱ्याच ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेती क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला. त्यानंतर मात्र आता यावर्षी तरी पाऊस कसा राहील? याबाबत अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न असून चिंतेचे वातावरण आहे.

कारण यावर्षी पाऊस चांगला होणे खूप गरजेचे आहे. तसे पाहायला गेले तर यावर्षी हवामान विभागाच्या माध्यमातून चांगला मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे यासोबतच आता जगातील काही प्रमुख हवामान संस्था व भारतीय हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली असून त्यांच्यानुसार आता चांगल्या मान्सूनचे संकेत मिळू लागल्याची माहिती देण्यात आली आहे.

 चांगल्या मान्सूनचे मिळाले संकेत

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रशांत आणि हिंदी महासागरात चांगल्या पावसाकरिता अनुकूल वातावरण दिसायला लागले असून मान्सूनच्या पहिल्या महिन्यातच अल निनोची परिस्थिती संपुष्टात येईल अशा प्रकारचा अंदाज जगातील सर्वच हवामान संस्थांनी वर्तवला होता.

परंतु आता काही आठवड्यातच ला नीना परिस्थिती तयार होऊ लागली. त्यासोबतच आता अमेरिकेतील हवामान संस्था व ऑस्ट्रेलियातील संस्थांनी  प्रशांत महासागरातील काही भागात पृष्ठभागावरील तापमानात वेगाने घट होत असल्याच्या दाव्यास पुष्टी दिली आहे.

त्यासोबतच भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून देखील भारतीय उपखंडातील परिस्थितीत  पावसाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक बदल होत असल्याच्या परिस्थितीला दुजोरा दिला आहे.

म्हणजे हिंदी महासागराच्या पश्चिमेकडील क्षेत्रामध्ये सागरी पृष्ठभागातील तापमान पूर्वेकडील क्षेत्राच्या तुलनेत उष्ण होऊ लागले आहे व अशा परिस्थितीत नैऋत्य दिशेकडून भारताकडे येणाऱ्या कमी दाबाची हवामान स्थिती वाढेल व नंतर चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 भारतामध्ये कधी होईल मान्सूनची  एन्ट्री?

भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाची प्रत्यक्ष एन्ट्री होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. मोसमी वारे हळू म्हणजेच मंदगतीने मार्गक्रमण करण्याची शक्यता असून बंगालच्या खाडीत अंदमान निकोबारच्या दक्षिणेकडील ग्रेट निकोबारमध्ये मान्सून धडकण्याच्या तारखेस अजून चार दिवस बाकी आहेत.

अजून देखील त्या ठिकाणी मान्सूनला पूरक परिस्थिती नाही. या बेटांवर 15 मे ला मानसून आल्यानंतर 20 मे पर्यंत उत्तरेकडील भागात मायाबंदर पर्यंतचे क्षेत्र मान्सून कडून व्यापले जाते. त्यानुसार आता भारतीय हवामान संस्था व खाजगी संस्थांच्या माध्यमातून केरळमध्ये मान्सूनचे आगमन कधी होईल यासंबंधीच्या आडाखे बांधण्यात येत आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये त्याची तारीख जाहीर होईल अशी अपेक्षा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe