किरकोळ कारणातून झालेल्या वादातून पत्नीला दुसर्‍या मजल्यावरून फेकले !

अहमदनगर :- किरकोळ कारणातून झालेल्या वादातून पत्नीला पतीने इमारतीच्या दुसर्‍या मजल्याच्या गॅलरीतून फेकल्याची घटना नगरमध्ये घडली आहे.

पती योगेश पोपटराव ओव्हळ ऊर्फ सावन (रा. केडगाव, नगर) याच्या विरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

पत्नी प्रियंका (वय 24) यात गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, केडगाव येथील लिंक रोडवर ओव्हळ दाम्पत्य राहते. सावन व त्याची पत्नी प्रियंका या दोघांमध्ये दुपारी किरकोळ कारणावरून भांडण झाले.

सावन याने रागाच्या भरात पत्नी प्रियंका हिला घराच्या गॅलरीतून खाली फेकून दिले. प्रियंका यात गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान प्रियंका हिच्या जबाबावरून कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.