कोपरगाव : आगामी वरसात पाच सहा महिन्यांनी राजकारणात उलथापालथ व्हईल. लक्ष्मीला पिडा राहील. ज्येष्ठामधी पाऊस पडलं. आषाढ महिन्यात पाऊस येणार नाय. कौर नक्षत्रात पाऊस पडल व पेरण्या व्हतिल.
मनुष्याला पिडा राहील. चैत्र महिन्यात गारा पडतील. पिवळ्या धान्याला महागाई राहील. नदीनाल्यांना पूर येतील. जसा माझा आनंद केला तसा नगरीचा आनंद राहील, असे व्हईक तालुक्यातील भोजडे येथील रामदास आसाराम मंचरे व शामराव शिवनाथ मंचरे यांनी बिरोबा यात्रेत भविष्य वर्तवले आहे.

कोपरगाव गावठाण भागात गांधी चौकानजिक बिरोबाचे पुरातन मंदिर आहे. त्याची यात्रा मंगळवारी झाली. यावेळी भोजडे, तळेगाव मळे, दहेगाव, धोत्रे, भगूर व गोधेगाव येथील देवाच्या कर्णमहल काठ्यांची व बिरोबाच्या मुखवट्याची शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
भंडारा उधळण्यात आला. बिरोबा महाराजांचा यावेळी जयजयकार करण्यात आला. सुवासिनींनी यावेळी औक्षण केले. हनुमान मंदिराजवळ पानसुपारी देण्यात आली. तत्पूर्वी सकाळी बिरोबा महाराजांना महामस्ताभिषेक घालण्यात आला.
मंदिर विद्युत रोषणाई व फुलांनी सजविण्यात आले होते. हजारो नागरिकांनी नतमस्तक होत दर्शन घेतले. यावेळी पारंपरिक धनगरी ओव्या म्हणण्यात आल्या. यात्रेसाठी दूरवरून नागरिकांनी हजेरी लावली होती.













