सहायक निबंधकासह लाच घेताना तिघांना अटक

शिरूर: लेखापरीक्षणाच्या तक्रारीतील चौकशीमध्ये चांगला अहवाल देण्यासाठी साडेआठ हजारांची लाच घेताना शिरूरच्या सहायक निबंधकासह मुख्य लिपिक व खासगी लेखा परीक्षक अशा तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.

सहायक निबंधक संजय कारभारी सोनवणे (५६), मुख्य लिपिक तुकाराम कोंडिबा वायबसे (४२), खासगी लेखा परीक्षक पद्माकर अवधूत कुलकर्णी (५७) अशी त्यांची नावे आहेत.

तीन आठवड्यांपूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शिरूर येथील तीन पोलिसांना लाच घेताना अटक केल्याची कारवाई ताजी असतानाच मंगळवारी या दुसऱ्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

बीड तालुक्यातील ईट येथील एक लेखा परीक्षक वकिलाने केलेल्या लेखा परीक्षणाबाबत तक्रारीची चौकशी सहायक निबंधक संजय सोनवणे यांच्याकडे होती.

यात चांगला अहवाल देण्यासाठी सोनवणे यांच्यासह वायबसे व कुलकर्णी या तिघांनी तक्रारदाराकडे साडेआठ हजार रुपयांची मागणी २७ नोव्हेंबरला केली होती.

तक्रारदार वकिलाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. यावरून बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी सापळा लावला.

शिरूर येथील कार्यालयात तक्रारदाराकडून साडे आठ हजार रुपयांची लाच घेताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.